कमवा आणि शिका

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि ग्रामीण भागातल्या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. परंतु बरेच गरीब विद्यार्थी अतिशय दरिद्री असल्यामुळे शिक्षण घेऊ शकत नसत. अशा विद्यार्थ्यांसाठी कर्मवीरांनी कमवा आणि शिका अशी योजना सुरू केली. तेव्हापासून ही संकल्पना चांगलीच लोकप्रिय झाली. मात्र आता सध्याच्या युगामध्ये एका वेगळ्या संदर्भात कमवा आणि शिका ही योजना राबवली जायला लागली आहे.

आयर्लंडच्या सरकारने आपल्या देशातील मनुष्य बळाची टंचाई निवारण्यासाठी कमवा आणि शिका अशी एक योजना जाहीर केली आहे. पण ही योजना गरीब विद्यार्थ्यांसाठी नाही. आयर्लंडमध्ये जाणवत असलेल्या मनुष्यबळाच्या टंचाईवर उपाय म्हणून ती जाहीर केली जात आहे. विशेषत: आयर्लंडमध्ये शिकायला येणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांनी तिथेच नोकरी करावी यासाठी ही योजना आहे. आयर्लंडमध्ये अनेक विद्यार्थी शिकायला येतात, परंतु तिथून शिकून ते अमेरिकेत किंवा ब्रिटनमध्ये अन्यत्र नोकरीला जातात. परंतु आयर्लंडला अलीकडच्या काळात तंत्रशिक्षण पुर्‍या केलेल्या विद्यार्थ्यांची चणचण जाणवत आहे. 

आयर्लंडला यूरोप खंडातील माहिती तंत्रज्ञानाची राजधानी म्हटली जाते. जगभरातल्या नामवंत कंपन्यांनी यूरोप खंडातील आपली मुख्यालये आयर्लंडमध्ये स्थापन केलेली आहेत. परंतु त्या मानाने त्यांना प्रशिक्षित मनुष्यबळ प्राप्त होत नाही. त्यामुळे आयर्लंडचा मनुष्यबळ आकृष्ट करण्याकडे कल आहे. अमेरिकेत उलट परिस्थिती आहे. अमेरिकेत शिकायला येणार्‍या विद्यार्थ्यांनी अजिबात नोकरी करता कामा नये, असा सरकारचा कटाक्ष आहे. कारण शिकायला आलेले विद्यार्थी नोकर्‍या करायला लागले तर अमेरिकेतल्या तरुणांवर बेकार राहण्याची पाळी येते. म्हणून अमेरिकी सरकार शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी नोकर्‍या करत नाहीत ना, यावर कटाक्षाने लक्ष ठेवत असते आणि म्हणूनच भारतातून तिकडे गेलेल्या काही विद्यार्थ्यांवर मनगटावर त्यांचे ठिकाण सूचित करणारे बॅन्ड बसविण्यात आले होते. आयर्लंडमध्ये मात्र बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांनी नोकरी करावी, असा आग्रह धरला जात आहे. ग्रिफीत विद्यापीठातील एम.बी.ए. च्या विद्यार्थ्यांना तशी विशेष सवलत देण्यात आलेली आहे. तिथे एम.बी.ए.च्या अभ्यासक्रमाचे दुसरे वर्ष हे पूर्णपणे वर्गाबाहेर पुरे केले जात असते. या वर्षात विद्यार्थी विविध कंपन्यांत जाऊन प्रत्यक्षात काम करून अनुभव आणि शिक्षण घेत असतात. या काळात विद्यार्थ्यांना नोकरी करता येईल अशी सवलत सरकारने दिली आहे.

आयर्लंडमध्ये एम.बी.ए. चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी १२ हजार ५०० यूरो एवढी फी असते. आता मात्र ही फी नोकरी करून मिळवता येईल. या काळात नोकरी करताना या विद्यार्थ्यांना दरमहा दीड ते दोन हजार यूरो एवढा पगार मिळू शकतो. म्हणजे एखादा विद्यार्थी आयर्लंडमध्ये जाऊन फार कमी पैशात एम.बी.ए.ही करू शकतो आणि नोकरीही करू शकतो. या दृष्टीने आयर्लंड सरकारने आपली व्हिसा आणि ग्रीन कार्डविषयक धोरणेही शिथिल केली आहे.

Leave a Comment