ऑप्टोमेट्री

कानांचे डॉक्टर कानांच्या काही विकृतीवर इलाज करीत असतात पण त्याआधी डॉक्टर नसणारे काही तज्ञ त्यांच्यावर प्राथमिक उपचार करीत असतात. त्यांना स्पिच थेरपिस्ट  म्हटले जाते. ते काही डॉक्टर नाहीत पण त्या क्षेत्रातले तंत्रज्ञ जरूर आहेत. अशीच सोय आता डोळ्यांच्या उपचाराबाबतही झाली असून  डोळ्यांवरचे प्राथमिक उपचार करणारी ऑप्टोमेट्री ही शाखा निर्माण झाली आहे. भारतात डोळ्यांच्या विकारांचे प्रमाण मोठे आहे. लहान मुलांना `अ’ जीवनसत्त्व पुरेसे मिळाले नाही की त्यांच्या दृष्टीत दोष निर्माण होतो. त्यावर वेळेत उपचार झाले नाहीत तर तो दोष वाढत जातो. योग्य त्या नंबरचा चष्मा मिळाला नाही तर पुढे त्या मुलाला अंधत्व येण्याची शक्यता असते. या ठिकाणी ऑप्टोमेट्रीचे काम सुरू होते.

भारतात या संबंधात करण्यात आलेल्या एका पाहणीत देशात १३ कोटी ३० लाख मुले असून त्यातल्या एक कोटी दहा लाख मुलांत काही ना काही दृष्टीदोष असल्याचे आढळले आहे. अशा मुलांचे डोळे तपासणे, त्यांना योग्य त्या नंबरचे चष्मे उपलब्ध करून देणे आणि दृष्टीतला दोष कमी व्हावा यासाठी प्राथमिक उपचार सुचविणे अशी कामे ऑप्टोमॅट्रिस्ट करू शकतो. डोळ्याच्या आणि दृष्टीच्या कोणत्याही उपचाराचा प्रारंभ बिंदू म्हणून त्याच्याकडे पाहता येते. एकप्रकारे तो दृष्टीच्या दोषांच्या बाबतीतला आरोग्यरक्षकच समजला पाहिजे. या शास्त्राचे शिक्षण देणार्‍या ५० संस्था भारतामध्ये आहेत. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍यांनी आपल्या नजिकच्या विद्यापीठात या संबंधात चौकशी केली तर त्यांना हे शिक्षण देणार्‍या संस्थांची माहिती मिळू शकेल.

बारावीच्या परीक्षेत ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणार्‍या कोणत्याही विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमास प्रवेश मिळू शकतो आणि हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. याच क्षेत्रामध्ये पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट करण्याचीही सोय आहे. हे अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. असे पदवीधर स्वत:चे ऑप्टोमॅट्रिक कन्सल्टींग रुम काढू शकतात, ज्यामध्ये लोकांना डोळ्यावरचे प्राथमिक उपचार देऊन बर्‍यापैकी पैसा मिळू शकतो. चष्मे, कॉन्टॅक्ट लेन्सेस आदी दृष्टीच्या दोषासाठी वापरली जाणारी साधने विकणे, त्यांची दुरुस्ती आणि रखरखाव हाही व्यवसाय करता येऊ शकतो. ही सारी साधने विकसित करणार्‍या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवणे हाही एक पर्याय आहे. एस्सीलार, सीबा व्हिजन, जॉन्सन ऍन्ड जॉन्सन, बॉश, ट्रान्झिशन्स अशा कंपन्यांमध्ये ऑप्टोमॅट्रिचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकते. त्याशिवाय डोळ्यांच्या मोठ्या दवाखान्यांमध्येही ऑप्टोमॅट्रिक तज्ञ म्हणून नोकरी मिळू शकते. डोळ्यांशी संबंधित साधनांची निर्मिती करणारे कारखाने आणि त्यांची विक्री करणारे ठोक विक्रेते यांनाही ऑप्टोमॅट्रिटिस्ट यांची गरज असते.

एकंदरीत बारावीनंतर वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेता आला नाही म्हणून निराश होण्याचे कारण नाही. ५० टक्क्यांपर्यंत मार्क मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना ही एक चांगली संधी आहे. कारण या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी डोनेशन द्यावे लागत नाही.

Leave a Comment