एनडीए मंत्रिमंडळात आता फक्त भाजपचे प्रतिनिधित्व

फोटो साभार नवभारत टाईम्स

केंद्रात सत्तेवर असलेल्या एनडीएच्या मोदी सरकार मध्ये आता फक्त भाजपचेच प्रतिनिधित्व असल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अकाली दलाच्या हरसिमरत कौर यांनी कृषी विधेयकाला विरोध म्हणून त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता तर लोकजन शक्तीचे खासदार रामविलास पासवान यांचे निधन झाल्याने त्या पक्षाचा एकही मंत्री मंत्रीमंडळात उरलेला नाही. सध्या केंद्रीय मंत्री परिषदेत म्हणजे राज्यसभेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले हे एकमेव दुसऱ्या पक्षाचे राज्यमंत्री आहेत.

शिवसेना भाजपचा प्रमुख सहयोगी पक्ष होता पण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका नंतर झालेल्या मुख्यमंत्रीपदाच्या वादावरून शिवसेना एनडीए पासून दुरावली आणि केंद्रीय मंत्रीमंडळातून शिवसेनेचे मंत्री अरविंद सावंत राजीमाना देऊन बाहेर पडले. गेल्या महिन्यात कर्नाटक भाजपचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाले. दोन मंत्र्यांचे निधन आणि दोन मंत्री मंत्रीमंडळातून बाहेर पडल्याने आता मोदींच्या कॅबिनेट मधील मंत्रीसंख्या २१ वर आली असून ते सर्व भाजपाचे आहेत.

मोदींच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळास वर्ष उलटून गेले तरी अजून मंत्रीमंडळाचा विस्तार किंवा त्यात फेरबदल झालेला नाही. लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीत मिळून सध्या ५३ मंत्री असून ही संख्या ८१ पर्यंत नेता येऊ शकणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकानंतर मंत्रीमंडलाचा विस्तार केला जाईल असे संकेत दिले गेले आहेत.