भाजप, काँग्रेसच्या सत्ताकाळात दलितांवर अनन्वित अत्याचार: मायावती


लखनौ: भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस सत्तेवर असताना समाजातील दलित आणि वंचित घटकांवर अनन्वित अत्याचार होत असल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केला. दलितांचे शोषण करण्यासाठी भाजप आणि काँग्रेसची हातमिळवणी असल्याची टीकाही त्यांनी केली.

बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्या पुण्यतिथीनिमित्त मायावती यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले. हाथरस प्रकरणावरून त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारवरही टीका केली.

दलितांवर अत्याचार करण्याबाबत भाजप आणि काँग्रेसमध्ये काहीही फरक नाही. हे दोन्ही पक्ष सत्ता राखण्यासाठी कोणत्याही पातळीवर उतरू शकतात, असा आरोप केला. मात्र, बसपाच्या मागे मोठा जनाधार आहे. आपला पक्ष दलित, वंचित आणि दुर्बल घटकांच्या संरक्षणासाठी, त्यांचे हक्क अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

दलितांकडून भाजप आणि काँग्रेस या पक्षांना निधी मिळण्याची शक्यता नसल्याने या पक्षांकडून दलितांच्या हक्कांची पायमल्ली केली जाते. त्यांच्यावर अत्याचार केले जातात. बसपा सामान्य कार्यकर्ते आणि गरीब जनतेकडून जमविल्या जाणाऱ्या वर्गणीवर चालतो. भाजप आणि काँग्रेसला देशद्रोही घटकांकडून पैसे पुरविला जातो, असा आरोपही मायावती यांनी केला. जातीयवादी, भांडवलही मनोवृत्तीच्या आणि मागास विचारांच्या पक्षाच्या प्रलोभनांना बळी न पडता बसपाचे हात मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.