उच्च न्यायालयाचा सवाल; तपास कसा करायचा हे देखील मीडियाच सांगणार का?


मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मीडिया ट्रायल घेणाऱ्या रिपब्लिकन टीव्हीसह काही वृत्त वाहिन्यांना चांगलेच फैलावर घेतले. पोलिसांचे अथवा संबंधित तपास यंत्रणेचे एखादी घटना घडल्यास त्याचा तपास करण्याचे काम आहे. पण हा तपास नेमका कसा आणि कोणत्या पध्दतीने करायचा हे सांगण्याचा अधिकार मीडियाला आहे का? असा सवाल मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी वृत्तवाहिन्यांना विचारला.

ज्येष्ठ वकील अस्पि चिनॉय यांनी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने बाजू मांडताना सांगितले की दोषी कोण हे ठरवण्याचा मीडियाला अधिकार नाही, तसेच एखाद्याला दोषी ठरवल्यानंतर त्याचे किती वाईट परिणाम होतात याची कल्पना या वाहिन्यांना नाही. दरम्यान अॅड. मालविका त्रिवेदी यांनी वृत्त वाहिन्यांच्या वतीने बाजू मांडताना न्यायालयाला सांगितले की माध्यमांच्या बातम्या प्रसारणावर बंदी घातली जाऊ शकत नाही. समाजात त्याचे वाईट परिणाम होतील. हाथरस प्रकरणाचे काय, त्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची नाही का? असा सवाल त्रिवेदी यांनी यावेळी उपस्थित केला त्यावर न्यायालयाने हा प्रश्न बंदीचा नाही तर जबाबदार पत्रकारितेचा असल्याचे त्यांना सांगितले.