देशापुढील खऱ्या धोक्याची जाणीव पंतप्रधानांना नाही: राहुल गांधी


नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशापुढे असलेल्या खऱ्या धोक्याची जाणीव नाही आणि त्यांना हे स्पष्टपणे सुनावण्याची हिंमत त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये नाही, अशा शब्दात राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले आहे.

गांधी यांनी पंतप्रधानांचा एक व्हिडीओ ट्विटरद्वारे रिट्विट केला आहे. यामध्ये पंतप्रधान पावनऊर्जेचा वापर करून समुद्राचे पाणी पिण्यायोग्य कारण्याबाबतचर्चा करीत आहेत. या व्हिडिओवर भाष्य करताना गांधी यांनी मोदी यांना देशासमोरच्या धोक्याची जाणीव नसल्याची टीका केली आहे.

मागील काही काळापासून गांधी यांनी पंतप्रधानांना चीनची भारतीय भूभागातील कथित घुसखोरी, कामगार व कृषी कायद्यातील सुधारणा यावरून धारेवर धरले आहे. पंतप्रधान घाबरट आहेत. आपण सत्तेवर असतो तर चीनला १५ मिनिटात हुसकावले असते, असे विधान त्यांनी नुकतेच केले आहे. नवे कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करून काँग्रेसने गांधी यांच्या नेतृत्वाखाली कृषी बचाव यात्राही सुरू केली आहे. कामगार कायद्यांच्या सुधारणेचा उद्देश असंघटीत क्षेत्र मोडीत काढणे हे आहे, असाही त्यांचा आरोप आहे.