मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण; FIR मध्ये रिपब्लिकचे नाही, तर इंडिया टुडेचे नाव


मुंबई – TRPमध्ये बनावटपणा करण्याच्या प्रकरणाला नवीन वळण लागले असून मुंबईतील टीआरपीची जबाबदारी सांभाळणारी कंपनी हंसा रिसर्च ग्रुप प्रायव्हेट लिमिटेडचे डेप्युटी जनरल मॅनेजर नितीन देवकर यांनीही एफआयआर दाखल केला असून जी कॉपी आतासमोर आली आहे, ज्यामध्ये ‘रिपब्लिक’ नाही तर ‘इंडिया टुडे’चे नाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई पोलिसांनी एफआयआरची प्रत पुढे आल्यानंतर स्पष्टीकरण दिले असून याबाबत माहिती देताना मुंबई पोलीस सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे म्हणाले की, इंडिया टुडेचे नाव हंसांच्या एफआयआरमध्ये देण्यात आले होते, पण अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने चौकशी दरम्यान रिपब्लिक टीव्ही व 2 मराठी वाहिन्यांचे नाव घेतले होते. आतापर्यंतच्या तपासाच्या आधारे या तिन्ही वाहिन्यांविरूद्ध पुरावे सापडले आहेत. अद्याप आमची चौकशी सुरू आहे. कोणत्याही वाहिन्यांविरूद्ध पुरावे आढळले, तर तपास त्यानुसार पुढे जाईल.

मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन दावा केला होता की बनावट टीआरपी मिळविण्याच्या खेळामध्ये रिपब्लिक टीव्ही आणि 2 मराठी वाहिन्यांचा सहभाग आहे. ते पैसे देऊन टीआरपी वाढवत होते. या प्रकरणात 2 मराठी वाहिन्यांच्या मालकासह 4 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली.

मुंबई पोलीस या प्रकरणात आज रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्नब गोस्वामी, प्रमोटर्स आणि काही दुसऱ्या लोकांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलवू शकतात. याचे संकेत कमिश्नर यांनी गुरुवारी दिले होते. त्यांनी म्हटले होते की, तपासाचा व्याप वाढल्यावर काही लोकांना समन्स पाठवले जाऊ शकते.

याबाबत माहिती देताना आयुक्तांनी सांगितले की तपासणी दरम्यान अशी घरे सापडली आहेत, जेथे टीआरपी मीटर बसवण्यात आले होते. पैसे देऊन या घरातील लोकांना दिवसभर एकच चॅनेल चालवले जात होते, जेणेकरून चॅनेलची टीआरपी वाढेल. त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, काही घरे असे आहेत जे बंद असूनही तिथे टीव्ही सुरू राहायचा. एका प्रश्नाचे उत्तर देताना आयुक्तांनी असेही सांगितले की चॅनल किंवा एजन्सीकडून या घरातील लोकांना दिवसाला 500 रुपयांपर्यंत पैसे दिले जात होते.