मराठीत न बोलणाऱ्या सराफाचा मनसे स्टाईलने समाचार, अखेर मागितली लेखिकेची माफी


मुंबई – मुंबईतील कुलाबा येथील महावीर ज्वेलर्स चालवणाऱ्या सराफाने मनसेने आपल्या स्टाईलमध्ये समाचार घेत माफी मागत नाही तोपर्यंत दुकान उघडू देणार नाही, असा इशारा दिल्यानंतर लेखिका शोभा देशपांडे यांची माफी मागितली आहे. या सराफाने माझ्याशी मराठीत बोला असा आग्रह धरल्याने लेखिका शोभा देशपांडे यांना कमी दर्जाची वागणूक दिली होती, त्याचबरोबर दोन महिला पोलिसांच्या मदतीने दुकानाबाहेर ढकलून दिल्याचा आरोप लेखिका शोभा देशपांडे यांनी केला होता. त्याचबरोबर काल दुपारी २ वाजल्यापासून त्या या दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन करत होत्या. आज या प्रकरणात मनसेने एंट्री घेत आपला हिसका दाखवल्यानंतर मुजोर सराफाने अखेर लेखिका शोभा देशपांडे यांची माफी मागितल्यानंतर मराठी लेखिका शोभा देशपांडे यांचे सुमारे २१ तासांपेक्षा जास्त काळानंतर मुंबईतील ठिय्या आंदोलन अखेर संपले आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास त्यांना असल्यामुळे सध्या त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

गुरुवारी दुपारी कुलाबा परिसरातील महावीर ज्वेलर्स या ठिकाणी लेखिका शोभा देशपांडे या गेल्या होत्या. त्यांच्याशी दुकानातील व्यक्ती हिंदीतून बोलत होते. शोभा देशपांडे यांनी त्यांना मराठीतून बोलावे अशी विनंती केली. तसेच दुकानाचा परवाना दाखवा असेही सांगितले. पण मराठीत बोलण्यास नकार तर दिलाच शिवाय त्यांनी दागिने देण्यासही नकार दिला. तसेच पोलिसांच्या मदतीने दुकानाबाहेर ढकलून दिल्याचा आरोप शोभा देशपांडे यांनी केला.

लेखिका शोभा देशपांडे यांनी मिळालेल्या या अपमानास्पद वागणुकीनंतर काल दुपारी २ वाजल्यापासून या दुकानाबाहेरच ठिय्या आंदोलन केले होते. दुकानदार येऊन जोवर दुकानाचे लायसन्स (परवाना) दाखवत नाही तोवर आपण आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. दरम्यान आज सकाळी मनसेचे नेते संदीप देशपांडे या ठिकाणी आले आणि त्यांनी लेखिका शोभा देशपांडे यांची भेट घेतल्यानंतर दुकानदाराला मनसे हिसका दाखवल्यानंतर या मुजोर सराफाने शोभा देशपांडे यांचे पाय धरले आहेत.

ग्राहक म्हणून मराठीत बोला ही केलेली लेखिका शोभा देशपांडे यांनी मागणी मुळीच चुकीची नाही. पण त्यांना दुकानदाराने जी वागणूक दिली ती फक्त चुकीची नसून निषेधार्ह आहे. एवढंच नाही तर पोलिसांनीही या प्रकरणात असंवेदनशीलता दाखवली. घरात बसलेल्या सरकारला याची जाणीव आहे का? असाही टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना दाखवला. एवढेच नाही तर महावीर ज्वेलर्सच्या सराफाने माफी मागितली आहे. पण अद्यापही परवाना दाखवलेला नाही. तो परवाना दाखवत नाही तोपर्यंत दुकान उघडू शकणार नाही याची काळजी मनसे घेईल असाही इशारा त्यांनी दिला आहे.