झायरा वासिम पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने इस्लामसाठी सोडले बॉलिवूड


अभिनेत्री झायरा वसिमनंतर इस्लामसाठी बॉलीवूड सोडल्यानंतर आता तिच्या पावलावर पाऊल ठेवत आणखी एका अभिनेत्रीने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला असून ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री सना खान हिने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित इस्लामसाठी आपण चित्रपटसृष्टी सोडत असल्याचे म्हटले आहे. आपल्या धर्माला मानत सना खानने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी इस्लामसाठी ‘दंगल’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री झायरा वसिम हिनेसुद्धा बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बराच वादसुद्धा झाला होता.


यासंदर्भात सना खानने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये माझ्या आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आज मी आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले आणि मला त्या काळात प्रसिद्धी, पैसा, सन्मान या सर्व गोष्टी मिळाल्या. पण पैसा आणि प्रसिद्धीच्याच मागे धावणे हा एकमेव जगण्याचा उद्देश आहे का, असा प्रश्न मला सतावू लागला. आपल्यापैकी प्रत्येकाचे गरजू व्यक्तींना मदत करण्याचे कर्तव्य नाही का? मी बऱ्याच काळापासून या प्रश्नांची उत्तर शोधत होते. मी जेव्हा माझ्या धार्मिक शिकवणीत या प्रश्नांची उत्तरे शोधली, मला तेव्हा समजले की फक्त पैसा आणि प्रसिद्धी कमावणे हाच आयुष्याचा एकमेव उद्देश नसल्यामुळे मी आजपासून फिल्म इंडस्ट्रीला कायमचा रामराम करण्याचा निर्णय घेते आणि यापुढे लोकांची, गरजूंची सेवा मी करेन.

‘बिग बॉस’च्या सहाव्या सिझनमध्ये सना खानने भाग घेतला होता. ती गर्लफ्रेंड प्रसिद्ध कोरिओग्राफर मेल्विन लुईसची होती. पण त्या दोघांचे काही दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाल्यानंतर तिने मेल्विनवर अनेक आरोपसुद्धा केले होते. आता सना पुन्हा एकदा चित्रपटसृष्टी सोडण्याच्या निर्णयामुळे चर्चेत आली आहे.