पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनकडून उभारण्यात येत आहे लष्करी पायाभूत सुविधा


नवी दिल्ली – भारतीय गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार लष्करी पायाभूत सुविधा पाकव्याप्त काश्मीरमध्ये उभारण्यात येत असून पाकिस्तानला यासाठी चीन सहाय्य करत आहे. यांसदर्भात इंडियन एक्सप्रेसने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार क्षेपणास्त्र डागता येणारी यंत्रणा पाकव्याप्त काश्मीरमध्ये उभारण्यात येत असून पाकिस्तानला त्यासाठी चीन मदत करत आहे. लडाख सीमेवर भारत चीनमध्ये तणावाचे वातावरण अद्याप कायम असून लष्कराने दोन आघाड्यांवर लढण्यास आपण सक्षम असल्याचे सांगितले आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधील लसाडाणा ढोक येथे पाकिस्तान व चीनचे लष्कर एकत्र जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्रांसाठी बांधकाम करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या ठिकाणी पाकिस्तानचे जवळपास १३० जवान व २५ ते ४० नागरिक काम करताना आढळले आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या बाघ जिल्ह्यातील मुख्यालयातून पाकव्याप्त काश्मीरमधील या साईटचे नियंत्रण करण्यात येणार आहे.

गुप्तचर विभागाला अशीही माहिती मिळाली आहे की, या नियंत्रण कक्षामध्ये चिनी लष्कराचे १० अधिकारी तैनात असतील. विशेष म्हणजे अशाच प्रकारचे बांधकाम पाकव्याप्त काश्मीरमधील झेलम जिल्ह्यातील चिनारीमध्ये व हाथियान बाला जिल्ह्यातील चाकोठी येथेही करण्यात येत असल्याची माहिती आहे. पाकिस्तान व चीन या दोन्ही देशांची लष्करे एकमेकांच्या संपर्कात असून उच्च स्तरावरील अधिकारी एकमेकांच्या सतत संपर्कात असल्याचे जून महिन्यात भारतीय लष्करी यंत्रणांच्या लक्षात आले होते.

भारतीय वायुसेना प्रमुख आरकेएस भादुरिया यांनी तीनच दिवसांपूर्वी सांगितले होते की आपल्याला पाकिस्तान व चीन एकमेकांना सहकार्य करत असल्याची कल्पना असून पाकिस्तान लष्करी साधन सामग्रीसाठी चीनवर अवलंबून आहे. चीन पाकिस्तानला मदत करत असल्याचे दिसत आहे, पण भारत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून गरज पडल्यास दोन आघाड्यांवर लढण्यास आपण सज्ज असल्याचेही भादुरियांनी स्पष्ट केले आहे.