अश्विनी कुमारांच्या आत्महत्येचा सीबीआयने तपास करावा – शिवसेना


मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर जे प्रश्न आणि शंका निर्माण झाल्या त्या सीबीआयचे माजी प्रमुख अश्विनीकुमार यांच्याबाबतीतही निर्माण होऊ शकतात. अश्विनीकुमार यांनी आत्महत्या का केली, हे रहस्य राहू नये. यासंदर्भात शिमल्याचे पोलीस तपास करतीलच. पण सीबीआयचे नेतृत्व केलेल्या अश्विनीकुमार यांच्या आत्महत्येने सीबीआयने तरी पापण्यांची उघडझाप करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

आपल्या देशात नक्की काय चालले आहे हेच कळायला मार्ग नाही. सुशांतसिंह राजपूतची हत्या नसून आत्महत्या असल्याचे वैद्यकीय पुरावे येऊनही ते मानायला काही लोक तयार नाहीत. हाथरसची तरुणी मरणाच्या दारातून सांगत आहे, माझ्यावर बलात्कार झाला. त्यावर सरकार विश्वास ठेवायला तयार नाही. आता सीबीआयचे माजी संचालक अश्विनीकुमार यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला. त्यांनी आत्महत्या का केली? हे रहस्य शोधण्यात कोणालाच रस नाही. काळ मोठा कठीण आला आहे हेच खरे!’ असेही शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.

सीबीआयचे माजी प्रमुख अश्विनीकुमार यांनी आत्महत्या केली. देशातील सामाजिक, राजकीय वातावरण बलात्कार, आत्महत्या अशा प्रश्नी गढूळ झाले असतानाच अश्विनीकुमार यांचा मृतदेह त्यांच्या सिमल्यातील घरी लटकलेल्या अवस्थेत सापडावा हे धक्कादायक आहे. सीबीआयच्या प्रमुख संचालकपदी काम केलेली व्यक्ती नैराश्याने ग्रासते, जगण्यासारखे काही उरले नाही, आयुष्याचाच कंटाळा आला आहे असे म्हणून आत्महत्या करते यावर आपण सगळे डोळे मिटून विश्वास ठेवतो, हे काही पटत नाही, असा टोलाही शिवसेनेने सामनाच्या माध्यमातून लगावला आहे.

अश्विनीकुमार हे फक्त सीबीआयचे संचालक नव्हते तर निवृत्तीनंतर ते नागालॅण्ड आणि मणिपूरचे राज्यपालही होते. हिमाचल राज्याचे ते पोलीस महासंचालक होते. त्याचबरोबर त्यांनी दिल्लीत प्रमुख राजकीय नेत्यांना विशेष सुरक्षा पुरवणाऱ्या एसपीजी गटात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. म्हणजे ते मनाने, शरीराने खंबीर असल्यामुळेच त्यांच्यावर सरकारने विशेष जबाबदाऱ्या सोपवल्या. अशी व्यक्ती अचानक आत्महत्या करते व त्यावर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही याचे आश्चर्य वाटते. अश्विनीकुमार यांना खरेच आयुष्याचा कंटाळा आला की त्यांच्यावर कुणाचा दबाव होता, यावर सध्या हिमाचलात वास्तव्यास असलेल्या ‘नटी’ने भाष्य केले पाहिजे, असा चिमटाही शिवसेनेने अभिनेत्री कंगना राणावतला काढला आहे.

कोणत्या परिस्थितीत अश्विनीकुमारांना आत्महत्या करावी लागली, हा प्रश्न कर्कश भुंकणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी विचारायला हवा. सुशांत प्रकरणात आत्महत्या नसून हत्याच आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्यांनी जिवाचा आटापिटा केला, त्यांना सीबीआयचे माजी प्रमुख अश्विनीकुमार यांच्या आत्महत्येमागे काहीतरी रहस्य आहे, कारस्थान आहे असे वाटू नये, हे गौडबंगाल असल्याची टीका देखील शिवसेनेने केली आहे.

यासाठी अश्विनीकुमार यांच्या आत्महत्येचे रहस्य उलगडायला हवे की, वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मानसिक स्थिती काय आहे? त्यांना कोणत्या दबावाखाली काम करावे लागते? त्यांना असे नैराश्येचे झटके का येतात? त्यांची मानसिक अवस्था बिघडलेली असेल तर ते लोक सैन्य किंवा पोलीस दलाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत काय? असा सवालही शिवसेनेने उपस्थित केले आहेत.