सोन्याच्या उल्कापिंडावर एलोन मस्कचे स्पेस एक्स करू शकते स्वारी

फोटो साभार युट्यूब

अंतराळात फिरत असलेला, अतिमौल्यवान धातूंची खाण असलेला एक उल्कापिंड पृथ्वीवर आणला गेला तर पृथ्वीवरील सर्व नागरिक कोट्याधीश बनतील असा ज्याचा बोलबाला केला जात आहे त्या ’१६ सायकी’ नावाच्या उल्कापिंडावर एलोन मस्क यांचे स्पेस एक्स यान रोबोटिक मिशनवर जाऊ शकेल अशी चर्चा सुरु झाली आहे. अमेरिकी अंतराळ संस्था नासा, स्पेस एक्सच्या मदतीने १६ सायकीबद्दल अधिक माहिती मिळविण्याचा विचार करत आहे असेही सांगितले जात आहे. १६ सायकी उल्कापिंड बटाट्याच्या आकाराचा असल्याचे दिसून आले आहे. या उल्कापिंडाची मोहीम राबवून परतण्यासाठी स्पेस एक्स ला किमान सात वर्षे लागतील असे समजते.

ब्रम्हांडाच्या रहस्याची उकल करण्यासाठी अंतराळ संस्था जितके अधिक प्रयत्न करत आहेत तितके त्याचे रहस्य अधिकच गुढ बनते आहे. वैज्ञानिक आणि खगोल संशोधकांनी मंगळ आणि गुरु या दोन ग्रहांच्या मध्ये १ छोटा उल्कापिंड शोधला असून तो अतिशय मौल्यवान धातूंचे मोठे भांडार असल्याचे दिसून आले आहे. त्याचे नाव ’१६ सायकी’ असे ठेवले गेले आहे. या उल्कापिंडावर प्रचंड प्रमाणात सोने, प्लॅटीनम, निकेल आणि लोखंड आहे. त्यातील फक्त लोखंड जरी पृथ्वीवर आणले गेले तरी ते विकून जगातील प्रत्येक व्यक्तीला ९२२१ कोटी रुपये मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या उल्कापिंडावरील सोने आणि प्लॅटीनमची किंमत अजून केली गेलेली नाही. वैज्ञानिक स्कॉट मूर् यांच्या म्हणण्याप्रमाणे या उल्कापिंडावरील सोने पृथ्वीवर आणले गेले तर जगभरातील सोने उद्योग अडचणीत येईल. कारण इतके मुबलक सोने उपलब्ध झाले तर सोन्याची किंमत कवडीमोल होईल. या उल्कापिंडाचा व्यास २२६ किलोमीटरचा आहे असेही समजले आहे.