मर्सिडीजची ऑल इलेक्टिक एसयुव्ही ईक्यूसी लाँच

फोटो साभार नवभारत टाईम्स

लग्झरी कार मेकर मर्सिडीजने भारतात पहिली ऑल इलेक्ट्रिक एसयुव्ही मर्सिडीज ईक्यूसी लाँच केली आहे. फुलचार्ज मध्ये ही कार ४०० किमीचे अंतर कापेल असा कंपनीचा दावा आहे. एसयुव्हीची भारतातील किंमत एक्स शो रूम ९९ लाख ३३ हजार आहे आणि सुरवातीच्या फक्त ५० युनिट साठी ही किंमत लागू राहील असा खुलासा कंपनीने केला आहे. पहिल्या टप्प्यात ही एसयूव्ही दिल्ली, बेंगलुरू, मुंबई, पुणे, हैद्राबाद आणि चेन्नई या सहा शहरात विक्रीसाठी उपलब्ध केली जात आहे.

या एसयुव्हीच्या बॅटरीवर कंपनीने ८ वर्षाची वॉरन्टी दिली आहे. कार मध्ये फ्लोर माउंटेड ८० केडब्ल्यूएच लिथियम आयन ची बॅटरी आहे. ही बॅटरी दोन इलेक्ट्रिक मोटर्सना पॉवर देते. एक मोटर पुढच्या चाकांना तर दुसरी मोटर मागच्या चाकांना पॉवर पुरविते. ही एसयुव्ही ० ते १०० किमीचा वेग ५.१ सेकंदात घेते आणि तिचा सर्वाधिक वेग आहे ताशी १८० किमी.

ही एसयूव्ही साधारण चार्जरने फुलचार्ज होण्यास १० तास लागतात तर डीसी फास्ट चार्जरने ती फक्त दीड तासात म्हणजे ९० मिनिटात फुलचार्ज होते. या एसयुव्हीला विंडस्क्रीन कॉकपिट, फ्रंट आणि रिअर मध्ये एलईडी स्ट्रिप, १२.३ इंची ड्युअल इन्फोटेनमेंट स्क्रीन, फ्रंट रो मध्ये मसाज फंक्शन अशी अनेक फिचर्स दिली गेली आहेत.