करोना चाचणी बाबत युएईचे वर्ल्ड रेकॉर्ड

जगभर हैदोस घातलेल्या कारोनाचा उद्रेक अजून कमी होण्याची चिन्हे दिसत नसली तरी करोना बाबत एक जागतिक रेकॉर्ड युएई म्हणजे संयुक्त अरब अमिरातीने नोंदविले आहे. हे रेकॉर्ड करोना चाचणी संदर्भातील आहे. युएईने त्यांच्या लोकसंखेच्या आकड्यापेक्षा अधिक करोना चाचण्या केल्या असून अशी कामगिरी बजावणारा जगातील तो पाहिला देश बनला आहे.

जगात तीन कोटीपेक्षा अधिक संखेने करोना संक्रमित रुग्ण आहेत आणि मृतांची संख्या १० लाखांच्यावर गेली आहे. करोनावर अजून खात्रीशीर लस आलेली नाही. अश्या परिस्थितीत अधिकाधिक संखेने नागरिकांच्या टेस्ट करणे हाच आत्ता करोना संक्रमण आटोक्यात आणण्याचा उपाय मानला जात आहे. युएईची लोकसंख्या ९९ लाख आहे आणि बुधवारी युएईने १ कोटी ४ लाख नागरिकांच्या करोना टेस्ट झाल्या असल्याचे जाहीर केले आहे. बुधवारी युएई मध्ये १०४६ नवीन रुग्ण आढळले असून एक मृत्यू झाला आहे.

आत्तापर्यंत युएई मध्ये १,०१,८४० जणांना करोना बाधा झाली असून ४३६ मृत्यू झाले आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ९१७१० इतकी आहे. करोना टेस्ट संदर्भात जगाचा विचार केला तर सर्वाधिक टेस्ट चीन मध्ये झाल्या असून हा आकडा आहे १६ कोटी. पण चीनची लोकसंख्या अब्जाहून अधिक आहे. करोना टेस्ट मध्ये अमेरिका दोन नंबरवर असून येथे ११ कोटी टेस्ट झाल्या आहेत. ८ कोटींहून अधिक टेस्ट करून भारत तीन नंबरवर आहे तर रशियाने पाच कोटी टेस्ट केल्या आहेत.

बुधवारच्या एका दिवसात जगभरात ३.४२ लाख नवे करोना रुग्ण आढळले असून ५८८२ जणांचा मृत्यू झाला आहे.