आयपीएल २०२० मध्ये एकाही खेळाडूची डोंपिंग टेस्ट नाही

युएई मध्ये सुरु असलेल्या आयपीएल २०२०च्या १३ व्या सिझन मध्ये २२ सामने आत्तापर्यंत खेळले गेले आहेत मात्र अजून एकाही खेळाडूची डोपिंग टेस्ट झालेली नाही आणि यापुढे होण्याची शक्यता नाही असे सांगितले जात आहे. राष्ट्रीय डोपिंग प्रतिबंधक संस्था (नाडा)च्या अधिकृत अधिकाऱ्यांना युएई ला जाण्याची परवानगी अद्यापी मिळालेली नसल्याचे कारण यामागे असल्याचे समजते.

वास्तविक बीसीसीआयने नाडा बरोबर या संदर्भातला करार करून त्यांना पैसेही दिले आहेत. पण केंद्राकडून या अधिकाऱ्यांना युएई साठी ग्रीन सिग्नल मिळाला नाही. यापुढे जरी परवानगी मिळाली तरी करोना बचावासाठी बीसीसीआय ने बायोबबल तयार केल्याने टीमचा उरलेला वेळ क्वारंटाईन मध्ये जाण्याची शक्यता आहे.

नाडाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुबई आणि शारजा साठी क्वारंटाईन पिरियड ७ दिवसांचा असला तरी अबुधाबी साठी तो १५ दिवसांचा आहे. आयपीएलची सुरवात १९ सप्टेंबर ला झाली आणि स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. वास्तविक नाडाची डोप कलेक्शन ऑफिसर टीम १२ सप्टेंबर रोजीच युएई ला रवाना होणार होती पण त्यांना अजूनही परवानगी मिळालेली नाही. यामुळे नाडाचे डीसीओ विविध राज्यातील कोविड ड्युटीवर रुजू झाले असल्याचेही समजते.