अंबाधाम शक्तीपिठात नाही अंबेची मूर्ती, होते यंत्र पूजा

आता साऱ्या देशभरातील भाविकांना नवरात्रीचे वेध लागले आहेत. १७ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होऊन नवरात्राची सुरवात होते आहे. देशभरातील हजारो देवी मंदिरात या निमित्ताने चैतन्याची उधळण होईल. गुजराथ मधील एक देवी मंदिर मात्र असे एकमेव मंदिर आहे जेथे देवीची मूर्ती नाही. येथे अंबा यंत्र स्थापन केले गेले असून या यंत्राचीच पूजा येथे केली जाते.

गुजराथ राजस्थान सीमेवर अहमदाबादपासून १८ किमीवर असलेले हे अंबाधाम  माता सतीच्या ५१ शक्तीपीठातील एक असून येथे माता सतीचे हृदय पडले होते असे मानले जाते. हे स्थान १२०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. येथील गर्भगृहात अंबेची मूर्ती नाही तर यंत्र असून हे अंबायंत्र कुणीही पाहू शकत नाही. त्यामुळे येथे पुजारी सुद्धा डोळ्यांना पट्टी बांधून पूजा करतात. या मंदिरात देशी तुपात बनविलेला प्रसादच वाटला जातो.

या मंदिरविषयी असेही सांगितले जाते की येथेच नंद आणि यशोदा यांनी कृष्णाचे जावळ काढले होते. तसेच सीतेच्या शोधासाठी राम आणि लक्ष्मण जात असताना त्यांनी येथूनच सीता शोधाची सुरवात केली होती आणि देवीने रामाला रावणाचा वध करण्यासाठी बाण दिला होता. वाल्मिकी ऋषींनी रामायणाचे लिखाण याच तपोभूमीत केले होते असेही मानले जाते.

या मंदिरात प्रवेश करताच भाविकांना मनशांती मिळते असा अनुभव येतो. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम १९७५ पासून सुरु आहे. पांढऱ्या संगमरवरात मंदिर बांधले गेले असून त्याचे शिखर १०३ फुट उंच आहे. त्यावर ३५८ सुवर्णकलश स्थापन केले गेले आहेत. नवरात्रीच्या दिवसात भाविक येथे गरबा खेळून त्यांची मनोकामना देवीला सांगतात आणि ती पूर्ण होते असा विश्वास आहे.