भवितव्य घडवताना…

दहावी किंवा बारावीचे निकाल लागल्यानंतर सुरू होते भवितव्याची चर्चा आणि ती तशी होणे साहजिक आहे. परंतु भवितव्य, आवड, कुवत, गरज आणि संधी या सर्वांचा छान मेळ साधून भवितव्याची वाट शास्त्रशुद्धपणे निवडणारे लोक फार कमी आहेत. एक तर मुलांच्या भवितव्याचा निर्णय पालकच घेत असतात. हा निर्णय घेताना त्याला विचारले जात नाही. तो आपला बळीचा बकरा झाल्याप्रमाणे पालक सांगतील त्या अभ्यासक्रमाकडे वळतो आणि मन मारून शिकत राहतो. तेव्हा पालकांनी अशी सक्ती करू नये. असे असले तरी हा निर्णय विद्यार्थ्यांवरही फार सोपवू नये. कारण तो सुद्धा काही फार परिपक्व नसतो. त्याच्या कल्पना सुद्धा वरवरच्या आणि बालीश असू शकतात. म्हणून भवितव्याचा निर्णय घेताना पालकाबरोबरच शिक्षकांनाही सहभागी केले पाहिजे. कारण शिक्षक विद्यार्थ्यांना चांगले ओळखत असतात. या तिघांच्या व्यतिरिक्त व्यवसाय मार्गदर्शक हाही एक चौथा घटक या निर्णय प्रक्रियेत गुंतवला गेला पाहिजे. पालकांच्या भावना, परिस्थिती, मुलाची आवड-निवड, कल आणि कुवत या सर्वांचा विचार करून शास्त्रशुद्धपणे निर्णय घेतला पाहिजे.

सध्या सर्वांनाच डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावेसे वाटते. तसे होताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, डॉक्टर आणि इंजिनिअर या दोन विद्या शाखा महत्वाच्याही आहेत, पैसे देणार्‍याही आहेत, प्रतिष्ठाही देणार्‍या आहेत. मात्र त्यांच्या या गुणांमुळे त्या शाखांकडे लोकांची गर्दी आहे. प्रवेश आणि शिक्षणानंतरच्या नोकर्‍या यामध्ये खूप स्पर्धा आहे. तेव्हा या शाखांना प्रवेश घेताना त्यांच्या विविध उपशाखांची नीट माहिती घेतली पाहिजे. वैद्यकीय व्यवसायामध्ये केवळ इंजेक्शन टोचणारा किंवा ऑपरेशन करणारा डॉक्टर याही पलीकडे किती तरी शाखा आहेत. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, पॅथॉलॉजी, इलेक्ट्रोपॅथी, ऍक्युप्रेशर, ऍक्युपंक्चर, दंतवैद्य, जनावरांचा डॉक्टर अशा इतरही शाखांची माहिती काढली पाहिजे. इंजिनिअरींगला सुद्धा हीच गोष्ट लागू आहे. याही व्यवसायामध्ये बदलत्या तंत्रज्ञानानुसार भरपूर शाखा निर्माण झालेल्या आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अभियांत्रिकी आहे. तेव्हा त्या सर्व शाखांचा अभ्यास झाला पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रापेक्षा अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये प्रचंड विस्तार झालेला आहे. सध्याच्या काळामध्ये ज्या दोन क्षेत्रात अगणित संधी निर्माण झालेल्या आहेत आणि होणार आहेत त्या माहिती तंत्रज्ञान आणि जैव तंत्रज्ञान या दोन शाखासुद्धा अभियांत्रिकीच्याच आहेत. तेव्हा त्यांचीही माहिती काढली पाहिजे आणि उगाच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी या दोन शाखांना गर्दी करण्यापेक्षा माहिती तंत्रज्ञानाचीही कास धरली पाहिजे. माहिती आणि जैव तंत्रज्ञान या दोन तंत्रज्ञानांशी निगडित असलेली बायोइन्फर्मेटिक्स ही शाखा सुद्धा अनेक तरुणांना खुणावत आहे. याही शाखेच्या पदवीधरांना लक्षावधी रुपयांचे पॅकेज अदा केले जात आहे. आपल्या जीवनामध्ये आपण दुर्लक्षित केलेली सगळ्यात मोठी परंतु तेवढीच महत्वाची शाखा म्हणजे अन्न पुरवठा आणि प्रक्रिया. हा विषय शेतीशी संबंधित आहे आणि शेतकरी नेहमी गरीबच असतो. त्यामुळे या शाखेकडे आपल्याला लक्ष द्यायचेच नाही, असा अनेकांचा निर्णय झालेला असतो. विशेषत: ज्यांच्या घरात परंपरागत शेती व्यवसाय असतो त्या घरांमध्ये जीवनाची एवढी अनिश्‍चितता अनुभवली गेलेली असते की, त्या घरातल्या सुशिक्षित मुलांना शेतीचे नाव सुद्धा काढू दिले जात नाही. शेतीपासून शक्यतो दूर आणि शेतीशी कसलाही संबंध नसलेला व्यवसाय किंवा शिक्षण घेतले पाहिजेत, असा विचार या घरात केला जात असतो. परंतु शेती म्हणजे प्रत्यक्षात धान्य उत्पादन, त्याचे विपणन, त्याच्यावर प्रक्रीया, त्याची विक्री आणि निर्यात या सार्‍या कामांचा समावेश असलेल्या अनेक विद्याशाखा आणि व्यवसाय आता विकसित झाले आहेत. त्यांचा विचार मुलांनी केला पाहिजे. या व्यवसायाला प्रचंड संधी आहे. कारण जैव तंत्रज्ञानामुळे शेती व्यवसायात अद्भूत वाटावेत असे शोध लागत आहेत आणि लागणार आहेत. या तंत्रज्ञानाशी संबंधित कोल्ड स्टोअरेज आणि त्याचे तंत्रज्ञान हे एक नवे क्षेत्र निर्माण झालेले आहे.

आपला व्यवसाय किंवा उच्च शिक्षणाची शाखा निवडताना सगळे लोक कुठे धावताहेत हे पाहू नये आणि सगळे धावतात म्हणून आपणही धावू नये. आपल्याला काही वेळा काही व्यवसायामध्ये विचित्र परिस्थिती आढळते. तिथे भरपूर नोकर्‍या असतात, पण त्या करणारी माणसे मिळत नाहीत. अशा क्षेत्रामध्ये चांगली संधी मिळू शकते आणि चांगले वेतनही मिळते. असा विचार केल्यास खालील काही क्षेत्रांची नावे समोर येतात. त्यांचा विचार सर्वांनी करावा. फॉरेन ट्रेड, बांधकामाशी संबंधित सारे व्यवसाय, वाहन उद्योगाशी संबंधित व्यवसाय, पत्रकारिता, माहिती तंत्रज्ञान, अन्न प्रक्रीया उद्योग, चित्रपटाशी संबंधित व्यवसाय अशा अनेक उद्योगांमध्ये आणि व्यवसायामध्ये खूप संधी उपलब्ध आहेत. त्याकडे लोकांची गर्दी नसली तरी आपण त्या क्षेत्रातली भावी काळातली गरज लक्षात घेऊन तिकडे प्रवेश घेतला पाहिजे.

Leave a Comment