बायोमेडिकल इंजिनिअरिंग

कोणतेही शास्त्र किंवा विद्या शाखा ही पूर्णपणे स्वतंत्र असू शकत नाही. कोठे ना कोठे तरी दोन शाखांचा संबंध जुडलेला असतोच. तीच गोष्ट अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि जीवशास्त्राला लागू आहे. खरे म्हणजे वैद्यकीय शास्त्राचा अभियांत्रिकी शास्त्राशी तसा प्रत्यक्ष संबंध काहीच नाही. कारण त्या तशा स्वतंत्र शाखा आहेत.

परंतु रुग्णालयाची इमारत उभी करावी लागते आणि त्या इमारतीतील सोयींचा शिल्पशास्त्राच्या दृष्टीने फार बारकाईने विचार करावा लागतो. तिथे अभियांत्रिकी शाखेचा संबंध येतोच. त्याशिवाय डॉक्टरांना लागणार्‍या विविध उपकरणांच्या निर्मितीत मेकॅनिकल इंजिनिअरचा हिस्सा असतोच.

तेव्हा इंजिनिअरिंग आणि अभियांत्रिकी यांचा संबंध असा कुठे तरी येतच असतो. जसे आपण बायोटेक्नॉलॉजी आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्या संबंधातून बायो इन्फर्मेटिक्स हे शास्त्र उदयाला आलेले पाहिलेले आहे. तसेच आता बायोमेडिकल इंजिनिअरिंग हे नवे शास्त्र पुढे आलेले आहे.

जे शास्त्र बायालॉजी म्हणजे जीवशास्त्र, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय या तीन शास्त्रांचा मेळ घालून या तिघांचा जिथे संबंध येतो तेवढ्याच अभ्यासक्रमाचा समावेश करून तयार केलेले आहे. नवीन वैद्यकीय उपकरणे तयार करणे, त्याच बरोबर ती तयार करणार्‍या उद्योगांचा आणि वैद्यकीय शास्त्राचा समन्वय घडवून आणणे असा या नव्या शास्त्राचा हेतू आहे.

नेमकेपणाने सांगायचे झाले तर बायोमेडिकल सायन्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यांच्या संबंधातील समस्या सोडवणे हे शास्त्राचे उद्दिष्ट आहे. या शास्त्रामध्ये इंजिनिअरिंग प्रोसेसेस, मेडिकल सायन्सेस्, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, क्लिनिकल सायन्सेस आणि बायोमेडिकल इंजिनिअरिंग या विषयांचे ज्ञान दिले जाते.

ही अभियांत्रिकी पदवी मिळविणारा अभियंता निरनिराळ्या जीवशास्त्रीय आणि वैद्यकीय उपकरणांची निर्मिती करण्यासाठीची आवश्यक ती गणिते करील आणि ती करताना डॉक्टरांच्या सर्व प्रकारच्या गरजा विचारात घेईल. त्याला त्या कळतील. कारण त्यासाठी आवश्यक तेवढे वैद्यकीय शिक्षण त्यांनी घेतलेले असेल.

या अभ्यासक्रमाच्या पदवीनंतर त्यातही स्पेशलायझेन करण्याची संधी आहे. बायोइन्स्ट्रुमेंटेशन, बायोमटेरियल्स, टिश्यू इंजिनिअरिंग, बायोमेकॅनिक्स, क्लिनिकल इंजिनिअरिंग, आर्थोपेडिक बायोइंजिनिअरिंग अशा विषयातले ते स्पेशलायझेशन असेल. आपल्याला कल्पना येत नाही परंतु या शास्त्राची फार गरज आहे. कारण नेमके रोगनिदान करण्यासाठी विविध यंत्रे आणि उपकरणे शोधली जात आहेत.

त्यांच्यामुळे वैद्यकीय उपचारांच्या क्षेत्रामध्ये क्रांती घडत आहे. वैद्यकीय उपचार अधिक नेमके होत आहेत. मात्र ही यंत्रे शोधण्याचे काम डॉक्टर करू शकत नाहीत. ती तंत्रज्ञांनाच शोधावी लागतात. परंतु तंत्रज्ञांना डॉक्टरांची गरज कळत नसते. म्हणूनच डॉक्टर कम् तंत्रज्ञ असा हा आगळावेगळा तंत्रज्ञ निर्माण करावा लागतो. बायोमेडिकल इंजिनिअरिंग या शास्त्राचे शिक्षण बहुतेक सर्व आय.आय.टी.मध्ये सुरू आहे आणि त्याला प्रवेश घेण्यासाठी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

Leave a Comment