न्यूनगंड नको

आपल्याला करीयर घडवायचे असेल आणि नाव काढायचे असेल तर सर्वात आधी एक गोष्ट केली पाहिजे की, मनातला न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. आपण इतरांपेक्षा कमी आहोत अशी भावना सतत मनात असणारा विद्यार्थी आपले भवितव्य घडवण्याच्या बाबतीत फार धाडसाने आणि आत्म विश्‍वासाने पावले टाकू शकत नाही. मनात न्यूनगंड बाळगून तो पुढेच आला नाही तर त्याला संधी कशी मिळणार आणि संधीच मिळाली नाही तर मग त्याची प्रगती कशी होणार?

सारे काही येत असतानाही सतत मागे राहणारे विद्यार्थी या सदरात मोडतात. कोणत्या प्रकारचे असतात हे न्यूनगंड? सर्वात मोठा न्यूनगंड म्हणजे आपण काही पुण्या मुंबईचे नाही. विशेषत: लहान गावातून म्हणजे सोलापूर, नगर, अमरावती, सांगली अशा शहरातून काही तरी करण्यासाठी पुण्यात किंवा मुंबईत गेलेली मुले आपण लहान गावातून आलो आहोत या कल्पनेनेच अनेक दिवस मागे राहतात.

पुण्या मुंबईची मुले जात्याच हुशार असतात आणि लहान गावातले विद्यार्थी मुळातच मठ्ठ असतात असा त्यांचा ग्रह असतो आणि तो गावात असतानाच गावातल्या लोकांनी निर्माण केलेला असतो. एखादा मुलगा लहान गावातून पुण्यात किंवा मुंबईत गेला की आधी ही शहरे पाहूनच हबकून जातो. तिथून न्यूनगंड वाढायला लागतो. आता आता माध्यमांचा प्रसार मोठा झाला असल्याने तसेच ज्ञानाची साधने खेड्यापाड्यांपर्यंत पोचल्याने पुण्या मुंबईच्या पोलिसांना आहे पण अन्य गावातल्या मुलांना नाही अशी कोणती माहिती राहिलेली नाही.

मात्र तरीही मोठ्या शहरातल्या मुलामुलींच्या मराठी बोलण्यातही इंग्रजी शब्द फार येतात. ती भाषा ऐकून लहान शहरातली मुले बिचकून जातात. त्यांनी एवढे लक्षात ठेवले पाहिजे की बोलण्यात अनेक इंग्रजी शब्द येणे हा सरावाचा भाग आहे तो काही बुद्धीमत्तेचा किंवा गुणवत्तेचा भाग नाही. या मुलांना मोठ्या शहरातली मुले त्यांच्या भाषेवरून हिणवत असतात पण ही भाषासुद्धा गुणवत्तेचा निकष नाही.

आकलन शक्ती, संवाद कौशल्य, संघटन चतुरता, कष्ट करण्याची तयारी ही खरी गुणवत्ता असते. या गोष्टी काही शहरातल्याच मुलांकडे असतात असे नाही. त्या कोणाकडेही असू शकतात. फारच तुलना करायची तर या गोष्टी लहान गावातल्या लोकांकडे जास्त असतात. मात्र काही संस्थांत ग्रामीण संस्कृती, संकल्पना आणि  रिती रिवाजावरून काही मुलांची चेष्टाही केली जाते. त्यातून या मुलांचा न्यूनगंड वाढत जातो. काही मुले तर यापायी चांगल्या नोकर्‍याही सोडतात.

पुण्याच्या एका आयटी कंपनीत अशाच चिडवा चिडवीवरून नगर जिल्ह्यातला एक मुलगा इतका दबून गेला की त्याने आपण पुण्यासारख्या शहरात राहण्याच्या लायकीचे नाही अशी भावना वाढून आत्महत्या केली. पण ज्यांना या चिडवा चिडवीतला व्यर्थपणा समजतो ते तिला काही महत्त्व देत नाहीत आणि आत्मविश्‍वासाने वागून आपल्या मुळातल्या बुद्धीमत्तेचे दर्शन घडवतात आणि आपणही मागे राहण्याची काही गरज नाही हे सिद्ध  करून देतात. तेव्हा कसल्याही प्रकारचा न्यूनगंड हा एक नंबरचा शत्रू आहे आणि आत्मविश्‍वास हा त्यावर तोडगा आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.

Leave a Comment