इव्हेन्ट मॅनेजमेंट

बदलत्या जीवनपद्धतीने विकसित केलेल्या काही नव्या व्यवसाय आणि उद्योग संधीत इव्हेन्ट मॅनेजमेंटचा आवर्जुन उल्लेख केला पाहिजे. कारण आता केवळ मोठ्या शहरातच नव्हे तर मध्यम आणि लहान शहरातही हा व्यवसाय मूळ धरायला लागला आहे. खरे तर या अभ्यासक्रमाच्या आधी या व्यवसायाची गरज निर्माण झाली आहे. हा व्यवसाय गरजेतून निर्माण झाला आहे. लोकांजवळ पैसा आहे आणि त्यापोटी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करावेसे वाटतात. त्यातून सर्व शहरांत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होत आहे. आजकाल शाळांचे गॅदरिंगही किती थाटात होते. त्यातच जाहीर सत्कार समारंभ, पुरस्कार वितरण समारंभ, व्याख्यानमाला, पुस्तकांचे प्रकाशन समारंभ असे नाना प्रकारचे समारंभ साजरे व्हायला लागले आहेत. या समारंभाची हौस तर आहे पण त्यांचे आयोजन करण्याइतकी सवड नाही आणि तेवढे मनुष्यबळही जवळ नाही.

कारण जीवन धकाधकीचे झाले आहे. अशा स्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे काम कोणावर तरी सोपवले की मग आपण तणावरहित अवस्थेत कार्यक्रमात यजमान म्हणून मिरवू शकतो. दुसरी एक बाब अशी की आपल्याकडे सवड आणि मनुष्यबळ असले तरीही कार्यक्रमाच्या आयोजनात व्यावसायिकता यावी असे लोकांना वाटायला लागले आहे. तशी ती आणायची झाली तर सारे काही सूत्रबद्धपणे करावे लागते. मग त्यात कार्यक्रमाची घोषणा करण्यापासून बातम्या छापून आणेपर्यंत सर्व काही व्यवस्थित करावे लागते.

बहुतेक ठिकाणी  अजून तरी हा व्यवसाय काही हौशी कार्यकर्ते करीत असतात. त्यातल्या बहुतेकांनी अजून तरी या कामाला व्यवसायाचे स्वरूप दिलेले नाही. त्यामुळे ते या कामाला पैसेही फार आकारत नाहीत.  पुण्या-मुंबईसारख्या काही शहरात मात्र इव्हेन्ट मॅनेजमेंट करणार्‍या  संस्था स्थापन झाल्या आहेत. तिथेही अजून इव्हेन्ट मॅनेजमेंटचे काम तर्कानेच केले जात आहे. या कामाची समाजाला किती गरज आहे हे लक्षात यायला लागल्याने या व्यवसायात आता पैसाही मिळायला लागला आहे आणि प्रशिक्षित कर्मचार्‍यांची गरज भासायला लागली आहे. या गरजेतून काही संस्थांनी इव्हेन्ट मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. संघटन कौशल्य अंगी असलेल्या, सृजनात्मक बुद्धीच्या आणि कलात्मक दृष्टीकोन असलेल्या तरुण तरुणींनी या क्षेत्रात उतरायला काही हरकत नाही. अभ्यासक्रमांचे नियोजन करणार्‍या संस्थांनी डिप्लोमा इन  इव्हेन्ट मॅनेजमेंट, डिप्लोमा इन  इव्हेन्ट मॅनेजमेंट आणि मास्टर्स डिग्री इन इव्हेन्ट मॅनेजमेंट असे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. डिप्लोमा कोर्स एक वर्षाचा बारावीनंतर, पदवी अभ्यासक्रम तीन वर्षांचा आणि बारावीनंतर तर पदव्युत्तर पदवी अन्य कोणत्याही पदवीनंतर दोन वर्षांनी असे अभ्यासक्रमांचे स्वरूप आहे. 

Leave a Comment