अभिनयाचा शॉर्ट टर्म कोर्स

अभिनयाच्या क्षेत्रात करीयर करण्याची प्रतिज्ञा करून उतरलेल्या तरुण आणि तरुणींना फिल्म अँड टीव्ही इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यासारख्या संस्था आहेत. ही संस्था तशी महाग आहे म्हणून काही लोकांना दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा पर्याय उपलब्ध असतो. आता आता तर काही विद्यापीठांत नाट्य शास्त्राचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. या अभ्यासक्रमांना पदवी नंतर प्रवेश दिला जातो पण अभिनयाची आवड असणार्‍या काही लोकांना नोकरी असल्याने असले कसलेच अभ्यासक्रम करता येत नाहीत. काहींना वेळेअभावी ते शक्य होत नाही तर काहींना ते आर्थिक स्थितीमुळे शक्य होत नाही. फावल्या वेळात कोठे तरी नाटकात काम करावे किंवा नोकरीच्या ठिकाणी कधी तरी आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवावी अशी उर्मी मात्र मनात असते.

महाराष्ट्रात हौशी नाट्य कलावंतांसाठी राज्य नाट्य स्पर्धा होत असतात आणि त्यात विविध केन्द्रांत सादर होणार्‍या नाटकात किमात पाच ते सहा कलाकार तरी चार पाच महिने नाटकमय झालेले असतात. त्यांच्या या हौसेला तांत्रिक मार्गदर्शन नसते पण तरीही या नाटकांतून अनेक व्यावसायिक नाट्य कलावंत आणि काही चित्रपट अभिनेतेही उदयाला आलेले आहेत. अशा कलावंतांच्या सोयीसाठी पुण्यात आता एक सोय झाली आहे.

गुरु दत्त फिल्म अकादमी ही संस्था गेल्या एप्रिलमध्ये सुरू झाली आहे. या संस्थेने साडे तीन महिन्याचा पूर्ण वेळेचा अभिनयाचा अभ्यासकम सुरू केला आहे. या संस्थेत `फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या नामवंत संस्थेतले अनुभवी शिक्षक शिकवायला येतात. गुरू दत्त हा हिंदी चित्रपट सृष्टीतला दिग्गज कलावंत होतो हे सर्वांना माहीत आहे. त्याचा मुलगा अरुण दत्त याने ही अकादमी सुरू केली आहे. या अभ्यासक्रमात शिकून तयार झालेली पहिली बॅच आता बाहेर पडली आहे. सध्या अनेक क्षेत्रात विशेषत: टीव्हीवरच्या मालिकांत अशा प्रशिक्षण मिळालेल्या  नव्या उगवत्या कलाकारांची मोठीच वानवा आहे आणि त्यांना चांगली मागणी आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम पुरा करणारांना मालिकांत, व्यावसायिक नाटकांत आणि चित्रपटातही मागणी आहे.  चित्रपटांत प्रवेश करून तिथे स्थिर होण्यासाठी कोणी तरी गॉडफादर मागे असावा लागतो किंवा घरात चित्रपट निर्मिती आणि कलेची परंपरा तरी हवी असे समजले जाते. पण आपल्या कामात गुणवत्ता असल्यास काहीही नसताना चित्रपटांत काम काढता येते. असे आता दिसून आले आहे. आपल्याला अशी अनेक उदाहरणे आपल्या भोवती दिसतील. गुणवत्तेला प्रशिक्षणाची जोड असल्यास अतुल कुलकर्णी किंवा भरत जाधव याच्या सारखा सामान्य कुटुंबातला तरुण चित्रपटसृष्टी गाजवू शकतो. हीच बाब चित्रपटसृष्टीच्या इतरही अंगांनाही लागू आहे. म्हणून या संस्थेचा चित्रपट निर्मितीच्या विविध अंगांचे प्रशिक्षण देणारा आणखी एक पूर्ण वेळचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार आहे. सध्या जगात लघुपटांना फार मागणी आहे. तिथे कॅमेरा हाताळणारे कुशल हात कमी पडतात.  चित्रित केलेल्या चित्रपटाच्या संपादनाचे काम करणारेही तंत्रज्ञ लागतात. गुरुदत्त अकादमी ही पुण्यात कोरेगाव पार्क भागात आहे.

Leave a Comment