बिहारच्या रणसंग्रामात उतरणार शिवसेनेचे हे 20 स्टार प्रचारक


नवी दिल्ली : शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 20 जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा यात समावेश आहे. शिवसेनेने नुकतीच निवडणूक आयोगाकडे ही यादी सोपवली आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या या यादीतील सर्व नेते निवडणुकांच्या प्रचारसभेत सहभागी होणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना 50 जागा लढवणार आहे. पण शिवसेनेला ही निवडणूक त्यांच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर लढता येणार नाही. तसे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

शिवसेनेचे स्टार प्रचारक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफन, प्रियंका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी

शिवसेनेने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण 20 नेत्यांची नावे असून 28 ऑक्टोबर रोजी बिहार विधानसभेचा पहिला टप्पा पार पडणार आहे. या निवडणुकांसाठी येत्या काही दिवसांतच प्रचारसभांची रणधुमाळी सुरु होणार आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने देखील काल (7 ऑक्टोबर) आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये महाराष्ट्रातून स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे तसेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.