‘एक राजा बिनडोक’ या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांविरोधात निषेधाचा सूर


मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर त्यावरुन राज्यातील वातावरण कमालीचे तापले आहे. खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांना मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेतृत्वाबद्दल समाजाकडून आवाहन केले जात असतानाच मराठा आरक्षण आंदोलनावरुन या दोन्ही राजेंवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जहरी टीका केली. प्रकाश आंबेडकरांनी ‘एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतली आहे पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत’ अशा शब्दात केलेल्या टीकेनंतर आता प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ही टीका निंदनीय असल्याचे आणि अशा प्रकारची टीका कदापि सहन करणार नसल्याचे सांगितले आहे. आरक्षणासंदर्भात दोन्हीही छत्रपतींनी भूमिका स्पष्ट केलेली असताना प्रकाश आंबेडकरांनी केलेली टीका आम्ही सहन करणार नाही. सरकारकडे आरक्षणासाठी मराठा समाज पाठपुरावा करत आहे. आम्ही सातारच्या गादीचा अवमान सहन करणार नाही. ही टीका सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीने मराठा आरक्षणाच्या मागणीला दिलेल्या पाठिंब्याचे स्वागत आहे. पण त्यांनी केलेल्या ‘एक राजा बिनडोक’ या वक्तव्याचा निषेध करत असल्याचे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले आहे. मराठा समाजातील सर्व नेत्यांनी आरक्षणासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आज संध्याकाळी बैठक असून मराठा आरक्षण, एमपीएससी परीक्षा, पोलीस भरती, नोकर भरती यासह विविध विषयांवर महत्त्वाचे मुद्दे मांडणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.

उदयनराजे यांच्या विरोधात प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर साताऱ्यातील कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. साताऱ्यात कार्यकर्त्यांनी एकत्र येत उदयनराजे जिंदाबाद, प्रकाश आंबेडकर मुर्दाबाद अशी घोषणाबाजी देखील केली. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर परळीमध्ये सुरू असलेल्या मराठा रोख ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध नोंदवला आहे. प्रकाश आंबेडकरांनी छत्रपतींच्या वारासदारांवर टीका करू नये, असे आवाहन केले आहे.