सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या


शिमला: केंद्रीय अन्वेषण विभागाचे माजी संचालक आणि मणिपूर, नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार यांनी काल (बुधवार) रात्री आपल्या निवासस्थानी आत्महत्या केली. ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

अश्विनी कुमार हे बुशवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी ते मृतावस्थेत आढळून आले. मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडली आहे. त्याबाबत कुटुंबियांकडून खातरजमा केली जात असून त्याबद्दल तपशील देण्यास पोलिसांनी नकार दिला. मात्र, ६९ वर्षीय अश्विनीकुमार काही काळापासून नैराश्यग्रस्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हिमाचल प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी असलेल्या अश्विनीकुमार यांनी ३७ वर्षांच्या पोलीस सेवेत हिमाचल प्रदेशाचे पोलीस महासंचालक म्हणून काम केले. त्यानंतर सीबीआयच्या संचालक पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. गुप्तचर संस्थेतील सेवाकाळात त्यांनी बहुचर्चित आरुषी तलवार हत्याकांडाचा आव्हानात्मक तपास पूर्ण केला. पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांना मणिपूर आणि नागालँड या राज्यांच्या राज्यपालपदाची जबाबदारीही देण्यात आली.