कोरोनाला चीनच जबाबदार, त्याची मोठी किंमत मोजावी लागेल; ट्रम्प


वॉशिंग्टन – राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात कोरोनाबद्दल मत व्यक्त करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला इशारा दिला आहे. ट्रम्प यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली असून ते अद्यापही यातून पूर्ण पणे बरे झालेले नाहीत. पण ट्रम्प अमेरिकेतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसमध्ये पुन्हा परतल्यानंतर देशाला संबोधित करताना, कोरोना महामारीला चीनच जबाबदार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. तसेच, याची मोठी किंमत मोजावी चीनला लागेल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला.

जगातील सर्वाधिक कोरोना प्रभावित देशांमध्ये अमेरिका अग्रस्थानी असून अमेरिकेतील लाखो लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कोरोनाची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही बाधा झाली असल्यामुळेच, ट्रम्प यांनी राष्ट्राला संबोधित करताना चीनला इशारा दिला. ना तुम्ही, ना मी कोरोना महामारीला जबाबदार आहे. जे घडले, त्याला चीनच जबाबदार आहे. जगाला चीनमुळेच मोठी किंमत चुकवावी लागत आहे. पण याची मोठी किंमत चीनला मोजावी लागेल.

तुम्हाला कोरोनाच्या परिस्थितीमुळे त्रास होत आहे, यात तुमची काहीही चूक नसल्यामुळे मला देशाला कोरोनामुक्त करायचे आहे, तुम्हाला याची किंमत भोगावी लागू नये, असे म्हणत अमेरिकेच्या नागरिकांना ट्रम्प यांनी धीर दिला. तसेच, मला झालेला कोरोना म्हणजे देवाचा आशीर्वाद आहे, कारण मला कोरोनामुळे बरच काही शिकायला मिळाले. मला रोगावरील उपचारासाठीच्या संभाव्य औषधांबाबत शिकता आले, असेही ट्रम्प यांनी ट्विटवरुन शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.