संभाजीराजेंवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल


नाशिक : राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुणरत्न सदावर्ते यांना अटक करा आणि त्यांची वकिलीची सनद रद्द करा, अशी मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली होती.

गुणरत्न सदावर्ते यांनी काल एका वृत्तवाहिनीवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सदावर्तेंचे वक्तव्य अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत निषेध करण्यात आला होता. सदावर्तेंनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत सकल मराठा समाज आणि करण गायकर यांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर नाशिकमधील सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सदावर्तेंविरोधात छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने गुणरत्न कोल्हापुरात संताप व्यक्त करण्यात आला. उत्तरेश्वर पेठ तरुण मंडळाकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या पोस्टरला कोल्हापुरी चप्पल मारुन निषेध करण्यात आला. कोल्हापूर शहरातील शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आले.

एका खाजगी वृत्तवाहिनीवरील चर्चेत ‘अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती आणि त्यांच्या घराण्याबद्दल जे वक्तव्य केले, ते अतिशय खालच्या पातळीचे आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा मी धिक्कार करतो, निषेध करतो. माझी महाराष्ट्र सरकारकडे स्पष्ट मागणी आहे. हा माणूस आधीपासूनच समाजात द्वेष पसरवण्याचे काम करत आहे. जातीयवाद पसरवत आहे. सदावर्ते यांच्यावर महाराष्ट्र सरकारने स्वतःहून गुन्हे दाखल केले पाहिजेत. त्यांना अटक केली पाहिजे. जातीयवाद आणि सांप्रदायिक दंगली भडकवण्याचा, त्यांचा जो उद्देश आहे, तो रोखला पाहिजे, अशी मागणी विनायक मेटेंनी केली.

बार कौन्सिलने गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलीची सनद काढून घेतली पाहिजे, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. असा माणूस कोणत्याही परिस्थितीत जो छत्रपतींबद्दल घाणेरड्या, अतिशय वाईट भाषेत बोलतो, त्याची वकील म्हणवून घ्यायची लायकी नाही. गुणरत्न सदावर्ते यांचा मी पुन्हा एकदा निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारकडे त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन अटक करण्याची मागणी करतो, असा संताप विनायक मेटे यांनी व्यक्त केला.