गरिबांच्या मृतदेहाचे राजकारण करणाऱ्यांवर उगारणार कायद्याचा बडगा: आदित्यनाथ


लखनौ: गरिबांच्या मृतदेहाचे राजकारण करणाऱ्यांना शोधून काढण्याचे काम पोलीस करीत असून त्यांच्यावर कठोरपणे कायद्याचा बडगा उगारला जाणार आहे, असा इशारा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.

हाथरस येथे कथित सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून विरोधक राजकारण करीत असल्याचा आदित्यनाथ यांचा आरोप आहे. असे राजकारण करणाऱ्यांचा शोध घेतला जात असून त्यांना कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, असे त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना सांगितले. हाथरस येथील कायदा सुव्यवस्था स्थिती सांभाळण्यासाठी सहाय्यक पोलीस महानिरीक्षक आणि उपमहानिरीक्षक दर्जाचे दोन अधिकारी रवाना करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

हाथरस येथील एका युवतीवर सामूहिकरित्या लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण राज्यात पेटले आहे. त्यावरून देशातही अनेक ठिकाणी निदर्शने, आंदोलने करण्यात आली. मात्र, विरोधक या प्रकरणाचे राजकीय भांडवल करून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. या प्रकरणाच्या आधारे जातीय विद्वेष निर्माण करून राज्यभर हिंसाचार घडवून आणण्याचा कट असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.