८८ व्या वायुसेना वर्धापनदिनी राफेल मुख्य आकर्षण

फोटो साभार रेफ्रेशर्स लाईव

भारतीय हवाई दलाचा ८८ वा वर्धापनदिन आज म्हणजे ८ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. या निमित्ताने दिल्ली येथील हिंडन बेसवर आयोजित करण्यात आलेल्या परेडमध्ये नव्याने वायुदलात सामील झालेले राफेल लढाऊ विमान मुख्य आकर्षणाचे केंद्र बनले होते.

लडाख भागात चीन बरोबर तणावाची स्थिती निर्माण झाली असतानाच आज साजऱ्या झालेल्या हवाई दलाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ५६ विमानांनी फ्लायपास्ट मध्ये भाग घेतला. त्यात या विमानांच्या मारक क्षमतेची झलक पाहायला मिळाली. त्यात प्रमुख आकर्षण होते राफेल. फ्लायपास्ट ची सुरवात आकाशगंगा पॅराजम्पिंग ट्रूपने केली. त्यांनी ट्रान्सपोर्ट विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी घेतली.

हेवी लिफ्ट हेलीकॉप्टर मी १७ यांच्या पाठोपाठ चितुक हेलीकॉप्टर आकाशात झेपावली. फिल्ड गन्स, तोफा वाहून नेणाऱ्या सी ग्लोबमास्टर, आयएल -७६ मिलिटरी ट्रान्सपोर्ट विमानांचे दर्शन होतानाच जमिनीवरच उभ्या स्थितीत सी सुपर हर्क्युलस विमानाचे दर्शन होत होते. या सर्व विमानांनी एलएसी चीन सीमेवर सैनिक, टँक, तोफा व अन्य सैनिकी सामान वेगाने फोरवर्ड लोकेशनवर पोहोचविण्याची कामगिरी यशस्वी केली आहे.

फ्लायपास्टचे मुख्य आकर्षण असलेली राफेल दोन परफॉर्मन्स मध्ये आकाशात झेपावलेली दिसली. पहिल्या विजय परफॉर्मन्स मध्ये त्यांच्या सोबत मिराज २०००, जग्वार, मिग २९ विमाने होती तर दुसऱ्या ट्रांसफॉरमर मध्ये स्वदेशी तेजस आणि सुखोई लढाऊ विमानांनी राफेलची साथ दिली

.

भारतीय हवाई दलाने १९३२ मध्ये त्यांचे काम सुरु केले होते. वायुसेनेच्या विमानाचे पाहिले उड्डाण १ एप्रिल १९३३ मध्ये झाले ते वजिरीस्तान मध्ये काबाईलियो विरुध्द लढताना. दुसऱ्या महायुद्धात हवाई दलाचा विस्तार करण्यात आला होता. त्यावेळी बर्मा मध्ये या दलाने महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती. १९४५ मध्ये रॉयल इंडिअन फोर्स असलेला हा विभाग १९५० मध्ये गणराज्य झाल्यावर त्यातील रॉयल शब्द काढून टाकला गेला. भारताचे सर्व संभावित धोक्यापासून संरक्षण करणे तसेच बचावकार्यात मदत ही वायूदलाची जबाबदारी आहे.

भारतीय हवाई दलाने अनेक युद्धात सहभाग घेतला आहे. दुसरे महायुद्ध, भारत चीन युध्द, ऑपरेशन कॅक्टस, ऑपरेशन विजय, कारगील युध्द, भारत पाक युध्द, कांगो संकट अशी ही मोठी यादी आहे.