हा देश छापणार सर्वाधिक मुल्याची, एक लाखाची नोट

फोटो साभार एमएसएन

काही काळापूर्वी तेलभांडार म्हणून जगाच्या नकाशावर असलेल्या व्हेनेझुएला देशाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. दर तीन नागरिकांमागे १ नागरिक उपाशी अश्या अवस्थेला हा देश पोहोचला असल्याने या देशाने १ लाख बॉलीवर (म्हणजे व्हेनेझुएलाचा रुपया) मुल्याची नोट छापण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी इटलीच्या बॅन कॅपीटल फर्मकडून ७१ टन सिक्युरिटी पेपरची आयात करण्यात आल्याचे समजते. ही फर्म अनेक देशांना सिक्युरिटी पेपर निर्यात करते. १ लाख बोलीवरची नोट ही जगात सर्वाधिक मुल्याची छापील नोट असेल असेही सांगितले जात आहे.

व्हेनेझुएला मध्ये महागाई गगनाला भिडली आहे. चलनाचे अवमुल्याने इतक्या खालच्या पातळीला गेले आहे की १ लाख बोलीवर मध्ये अर्धा किलो तांदूळ किंवा दोन किलो बटाटे इतकेच सामान मिळते. या नोटेची किंमत ०.२३ युएस डॉलर्स बरोबर आहे. नागरिकांनी पोतेभर नोटा नेल्या तर त्यांना एका छोट्या पिशवीत मावतील इतक्याच गरजेच्या वस्तू मिळू शकतात. नागरिकांना जास्त नोटा न्याव्या लागू नयेत म्हणून १ लाख मुल्याची ही नोट छापली जात आहे असेही सांगितले जात आहे.

तेल विक्रीतून मिळालेला पैसा कधीच संपला आहे. त्यात करोनाची भर पडली आहे. भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे की पायी चालण्यासाठी सुद्धा नागरिकांना लाच द्यावी लागते. सोने विकून सामान आणण्याची पाळी आली आहे तरीही अनेकांना दोन वेळचे अन्न मिळणे मुश्कील बनले आहे. यामुळे २०१३ पासून सुमारे ३० लाख नागरिक स्थलांतर करून शेजारी ब्राझील, कंबोडिया, इक्वाडोर, पेरू या देशातून जात आहेत. परिणामी त्या देशांनी व्हेनेझुएलाच्या सीमेवर त्यांची सैन्ये तैनात केली आहेत.

देशात राष्टपती कोण याचा खुलासा होऊ शकलेला नाही. २०१९ च्या सुरवातीला निकोलस मादुरो निवडणूक जिंकले होते पण त्यांनी मतदानात गडबड केल्याचे आरोप झाले. त्यामुळे मादुरो यांचे प्रतिस्पर्धी खुआन गोईडो यांनी स्वतःला राष्ट्रपती म्हणून घोषित केले आहे.