‘एम्स’च्या अहवालावर सुशांतच्या कुटुंबियांचा आक्षेप


नव्या ‘फोरेन्सिक टीम’च्या नियुक्तीची मागणी
नवी दिल्ली: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी ‘एम्स’ रुग्णालयाने सादर केलेल्या न्यायवैद्यकीय अहवालावर त्याच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नव्या ‘फोरेन्सिक टीम’ची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी वकील विकास सिंह यांच्यामार्फत केली आहे.

सुशांतचा मृत्यू गळ्याला फास लागून झाला एवढेच ‘एम्स’ सांगू शकते. ती आत्महत्याच होती असा निकष त्यांनी कसा काढला? ते काम सीबीआय करीत असून तपासनंतर त्याबाबत निष्कर्ष काढला जाईल, असे वकिलांनी नमूद केले आहे. आपण फोरेन्सिक अहवालाची प्रत मिळावी अशी विनंती फोरेन्सिक टीमचे प्रमुख डॉ सुधीर गुप्ता यांच्याकडे केली. मात्र, त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अहवालाबाबत जी माहिती प्रसिद्ध झाली आहे ती खरी असेल तर हा अहवाल अपुऱ्या तथ्यांवर आधारित आणि चुकीचा आहे, असा आरोप करून, सीबीआयने विविध रुग्णालयातील तज्ज्ञांचा समावेश असलेली नवी टीम नियुक्त करावी, अशी मागणीही विकास सिंह यांनी केली.

डॉ. सुधीर गुप्ता यांनी आपल्या अहवालातील काही भाग माध्यमांसमोर सांगितला. माध्यमांसमोर बेजबाबदार विधाने केली. सुशांतने आत्महत्याच केली आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा घातपात किंवा कट नव्हता, असे त्यांनी सांगितले. डॉ. गुप्ता यांचे हे वर्तन अव्यावसायिक आणि अनैतिक आहे, असा आरोपही ऍड. विकास सिंह यांनी केला.