…त्यामुळे माझीसुद्धा खुर्ची समाजासोबत खाली असावी – छत्रपती संभाजीराजे


नवी मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातील मराठा संघटनांच्या विविध बैठका आणि आंदोलन होत आहे. नवी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाकडून आरक्षणाबाबत पुढची दिशा काय असावी यासाठी राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे या बैठकीला दोघेही उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात होते, पण या बैठकीला उदयनराजे येऊ शकले नाहीत.

या राज्यस्तरीय बैठकीला छत्रपती संभाजीराजे यांनी हजेरी लावली, पण संभाजीराजेंनी मुख्य व्यासपीठावर बसण्यास नकार दिला, संभाजीराजे यावेळी म्हणाले की, आपण या व्यासपीठावर दोन मोठ्या खुर्च्या छत्रपतींचा आदर, सन्मान राखत ठेवल्या. त्याबद्दल आभारी आहे. मी मोठा नाही तर छत्रपती घराणे मोठे आहे. पण हा शिष्टाचार ठेऊ नये, याठिकाणी मी येतो तो मराठा समाजाचा सेवक म्हणून येतो, मानपान ज्याठिकाणी ठेवायचे त्याठिकाणी आम्ही पुढाऱ्यांकडून घेतो, परंतु आज या बैठकीला मी सेवक म्हणून आलो असल्यामुळे माझी खुर्चीसुद्धा समाजासोबत खालीच असावी असे त्यांनी सांगितले.

तसेच राजर्षी शाहू महाराज मराठा समाजाच्या एका कार्यक्रमाला गेले होते, तेव्हा त्यांनी सांगितले, मी शेतकरी आहे, तुमचा सेवक आहे. मी तुमच्यातीलच एक आहे, तेव्हा शाहू महाराजांनी समाजाचा सेवक म्हणून काम केले, अशी आठवणही छत्रपती खासदार संभाजीराजेंनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितली.