कोरोना प्रतिबंधक लस बनविण्याच्या शर्यतीत आता रिलायन्स देखील


मुंबई – संपूर्ण जगात मागील अनेक महिन्यांपासून कोरोना या दुष्ट व्हायरसने थैमान घातले असून या व्हायरसचा बिमोड करणारी लस तयार करण्यासाठी जगभरातील अनेक कंपन्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या निर्मितीबाबत नवीन माहिती समोर येत आहे. ती अशी की, लसनिर्मिती करत असलेल्या कंपन्यांमध्ये आता रिलायंस लाईफ सायंसेज कंपनीचा समावेशही झाला आहे. कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी या कंपनीला देखील आता परवानगी मिळाली आहे. तत्पूर्वी आपल्या देशातील भारत बायोटेक, सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया, जायडस कॅडीला यांसारख्या कंपन्याही लस तयार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्री आणि सरकारने काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या दोन लसी पुढच्यावर्षी सुरूवातीच्या तीन महिन्यांमध्ये यशस्वीरित्या तयार होऊ शकतात. आता कोरोना प्रतिबंधक लसीच्या शर्यतीत अजून एका कंपनीची भर पडली आहे. ती म्हणजे मुकेश अंबानी यांच्या रिलायंस इंडस्ट्रीजचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रिलायंस लाइफ साइंसेज (RLS) या कंपनीची. ही कंपनी कोरोना प्रतिबंधक लस तयार करणार आहे. या लसीची प्राण्यांवरील प्री क्लिनिकल टेस्ट या महिन्यापासून सुरू होणार आहे. जी नवीन लस रिलायंसने तयार केली आहे. ती लस रीकॉम्बिनेंट प्रोटीनबेस्ड कोविड लस आहे. या लसीच्या चाचणीचे परिणाम २०२१ च्या पहिल्या तीन महिन्यात समोर येऊ शकतात. या कंपनीकडून कोरोना काळात टेस्टिंग कीट्ससह लॅबोरेटरी उत्पादने तयार करण्यात आली आहेत. आता लसीची निर्मिती, वितरण, याकडेही कंपनीकडून लक्ष केंद्रीत केले जात आहे.