भेटीला आलेल्या मूर्तिकारांना राज ठाकरेंनी दिली धोक्याची सूचना


मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले असून अनेकजणांच्या पोटापाण्याचा प्रश्ननिर्माण झाला आहे. याच दरम्यान अनेकजण आपल्या मागण्यांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेत आहेत. दरम्यान पेणमधील मूर्तिकार बुधवारी राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले होते. त्यांनी यावेळी राज ठाकरेंसमोर प्लास्टर ऑफ पॅरिसवर (पीओपी) केंद्राने बंदी घातली असल्यामुळे मूर्ती घडवणे कठीण जात असल्याची व्यथा मांडली. मूर्तिकारांनी राज ठाकरेंकडे बंदी उठवण्यासाठी मदत मागितली आहे.

पण यावेळी मूर्तिकांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या जागी शाडूच्या मूर्ती करण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. नदी, समुद्र यात प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. चौपाट्यांवर विसर्जनानंतर असंख्य गणपतीच्या मूर्ती दिसतात. हे चित्र फार भीषण असते. ज्या गणपती बाप्पाची एवढ्या श्रद्धेने पूजा, विसर्जन करतो, तिच मूर्ती किनाऱ्याजवळ असलेले दृष्य बघायला खूप विदारक असते. त्यामुळे शक्य असेल तितक्या शाडूच्या किंवा मातीच्या मूर्ती बनवणे हे जास्त संयुक्तिक असेल, असे राज ठाकरे यांनी मूर्तिकारांना सांगितले.

वेगळा विचार करुन पाहण्याचा सल्ला राज ठाकरेंनी मूर्तिकांना दिला आहे. यावेळी त्यांनी उद्या जर परदेशातून मूर्ती आल्या तर तुम्ही काहीही करु शकत नाही, अशी धोक्याची सूचनाही दिली. यावेळी मूर्तिकारांना पर्यायी मार्गाचा विचार करण्याचा सल्ला देताना राज ठाकरेंनी आपण समुद्रात विसर्जनासाठी काही वेगळा पर्याय उपलब्ध होईल का यासंबंधी सरकारमधील व्यक्तीशी चर्चा करु, असे आश्वासन दिले.