आम्ही जर सत्तेत असतो, तर चिनी ड्रॅगनला 15 मिनिटात हुसकावूण दिले असते : राहुल गांधी


कुरुक्षेत्र : भारत-चीन सीमा वादावरून मोदी सरकारवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. हरियाणामध्ये बोलताना राहुल गांधींनी म्हटले की, पंतप्रधान स्वत:ला देशभक्त म्हणवतात, पण संपूर्ण देशाला माहिती आहे की चीनी सैन्य भारतात घुसले आहे. मग हे असे कसले देशभक्त आहेत? मी सांगतो की, जर आम्ही (काँग्रेस) सत्तेत असतो, तर चीनला देशाबाहेर काढायला 15 मिनिटेही लागली नसती. चीनी सैन्याला भारतीय सैन्याने 100 किमी दूर केले असते.

आमचे सरकार जेव्हा होते तेव्हा मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की, आपल्या देशात पाऊल टाकण्याएवढी चीनची हिंमत नव्हती. आज संपूर्ण जगात एकच देश आहे, ज्या देशामध्ये दुसर्‍या देशाच्या सैन्याने घुसखोरी केली आहे आणि भ्याड पंतप्रधान म्हणतात की या देशाची जमीन कोणी घेतली नाही, असा शब्दात राहुल गांधींनी हल्लाबोल केला.

त्याचबरोबर पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, चीनमध्ये भारतात घुसखोरी करण्यासाठी एवढी हिम्मत कुठून आली हे मी तुम्हाला सांगतो. देश नरेंद्र मोदींनी कमकुवत केल्याचे त्यांना माहित आहे. देशाचे पंतप्रधान कोरोना काळात अपयशी ठरले आहेत. देशातील शेतकरी व मजूर कमकुवत झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची शक्ती ओळखत नाहीत. शेतकऱ्यांची शक्ती नाही ओळखत, कामगारांची शक्ती ओळखत नाही.