एकनाथ खडसेंना रामदास आठवलेंची आरपीआयमध्ये येण्याची ऑफर


मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआय प्रमुख रामदास आठवले यांनी ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत जाण्यापेक्षा आरपीआयमध्ये यावे, आपण आपले सरकार आणूया असे आवाहन केले आहे. त्याचबरोबर ते कधीच राष्ट्रवादीत जाणार नाही आणि त्यांना जायचे असते तर आधीच गेले असते. आता तर ते मंत्री झाले असते. पण राष्ट्रवादीत आता सगळे फुल्ल असल्याचे आठवले म्हणाले. रामदास आठवले सह्याद्री गेस्ट हाऊसवर ६ डिसेंबर निमित्त आयोजित बैठकीनंतर बोलत होते.

कोरोनाचे संकट अद्याप कमी झाले नसल्याने ६ डिसेंबरला लोकांनी दादर चौपाटीवर येऊ नये. सगळ्यांनी घरातच महापरिनिर्वाण दिन साजरा करण्याचे आवाहन आठवलेंनी केले. चैत्यभूमीचे ऑनलाईन दर्शन घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी रामदास आठवलेंनी शरद पवार यांच्या टीकेवर बोलणे टाळले. पवारसाहेब आपले चांगले मित्र असून ते आदर स्थानी आहेत. त्यांना उत्तर देणार नाही. मी माझी भूमिका मांडत असतो, असे त्यांनी म्हटले आहे.

संजय राऊतांनी आठवलेंवर हाथरस प्रकरणावरुन टीका केली होती. आठवलेंनी त्या टीकेला प्रत्युत्तर दिले असून कंगनाच्या वक्तव्याशी मी सहमत नाही. तिला मुंबईत राहायचा अधिकार आहे म्हणून मी तिच्या पाठीशी उभा राहिलो. मी नटींच्या गर्दीत राहत नाही. मी कार्यकर्त्यांच्या गर्दीत राहतो, असे त्यांनी म्हटले. हाथरसमध्ये मी जाऊन आलो, तुम्ही कधी जाणार आहात ? असा प्रश्न त्यांनी राऊतांना विचारला. हाथरस घटनेचा मी निषेधच करतो. आमच्या पार्टीनेही जागोजागी आंदोलन केले. परस्पर अंत्यसंस्कार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना योगींनी निलंबित केले आहे.