ट्रम्प यांचे नवे व्हिसा धोरण भारतीय तंत्रज्ञांसाठी प्रतिकूल


वॊशिंग्टन: अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसाबद्दलचे धोरण अधिक कडक केले आहे. त्यानुसार अमेरिकन युवकांच्या नोकऱ्या सुरक्षित राहाव्या म्हणून ‘एच १ बी व्हिसा’चे प्रमाण घटविले आहे. त्याचा परिणाम भारतीय तंत्रज्ञांच्या अमेरिका वारीवर होणार आहे.

अमेरिकेकडून दरवर्षी ८५ हजार जणांना आपल्या देशात येऊन नोकरी, व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येते. मात्र, यामुळे अमेरिकेतील ५ लाख युवकांचे रोजगार हिरावले गेल्याचा ट्रम्प प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे ही संख्या १/३ ने घटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेत नोकरी व्यवसायासाठी येणाऱ्या विदेशी लोकांपैकी बहुतेक जण भारतीय आणि चिनी असतात. या नव्या बदलामुळे भारतातून अमेरिकावारी करणाऱ्या तंत्रज्ञांवर त्याचा परिणाम होणार आहे.

अमेरिकेत लवकरच अध्यक्षपदाच्या निवडणुका होत आहेत. अध्यक्ष ट्रम्प पुन्हा ही निवडणूक लढवीत आहेत. या निवडणुकीसाठी युवा वर्गातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी ट्रम्प यांनी हे पाऊल उचललेले आहे. विदेशातून रोजगारासाठी येणाऱ्या लोकांमुळे ५ लाख अमेरिकन युवकांना बेरोजगार व्हावे लागले आहे, असा दावा अमेरिकन प्रशासनाने केला आहे.