देशातील सर्वात मोठ्या जेवर विमानतळासाठी झुरिक कंपनीशी करार

देशातील सर्वात मोठा विमानतळ उत्तरप्रदेशातील नोईडा विभागात जेवर येथे उभारला जात असून त्याचे कंत्राट स्वित्झर्लंड मधील कंपनीला मिळाले आहे. नोईडा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड म्हणजे नियाल आणि झुरीच कंपनी मध्ये सात ऑक्टोबर रोजी विमानतळ उभारणीचा करार केला जात आहे. २०२३ पासून या विमानतळावरून उड्डाणे सुरु करण्याचे ध्येय निश्चित केले गेले आहे.

या प्रकल्पासाठी झुरीच इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड एजी ने यमुना इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लिमिटेड नावाने स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनी बनविली आहे. ही कंपनी आणि नियाल यांच्यात आज करारावर सह्या होणार आहेत. करोना मुळे झुरीच कंपनीचे प्रतिनिधी भारतात येऊ शकलेले नाहीत. या संदर्भात ऑनलाईन पत्रकार परिषदेचे आयोजन केले गेले असून त्यात अनेक देशांचे पत्रकार सामील होत आहेत असे समजते.

या प्रकल्पासाठी २९५०० कोटींची निविदा होती आणि अडाणी, दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड अश्या अनेक कंपन्यांनी बोली लावली होती. मात्र झुरीच कंपनीने प्रती प्रवासी ४००.९५ रुपये महसूल देण्याची तयारी दाखविली आणि ही सर्वाधिक किंमत ठरल्याने या कंपनीला प्रकल्प उभारणीचे काम मिळाले होते.

या विमानतळाचा लाभ २२ जिल्ह्यांना होणार असून त्यामुळे लाखोंच्या संखेने रोजगार निर्मिती होणार आहे.