देशविदेशी १६ मोबाईल उत्पादक कंपन्यांना परवानगी

केंद्र सरकारने स्थानिक व आंतरराष्ट्रीय मोबाईल उत्पादक कंपन्यांना भारतात ११ हजार कोटींचे गुंतवणूक प्रकल्प सुरु करण्यास मंगळवारी मंजुरी दिली आहे. त्यानुसार आगामी पाच वर्षात १०.५ लाख कोटी मोबाईल फोन तयार होणार आहेत आणि २ लाख थेट रोजगार तर लाखो अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत.

परवानगी देण्यात आलेल्या कंपन्यात आयफोन बनविणाऱ्या आंतरराष्ट्रीय अॅपल कंपनीची सहयोगी फॉक्सकॉन होन हाई, विस्ट्रोन, पेगाट्रोन, सॅमसंग, रायझिंग स्टार या विदेशी कंपन्या आहेत तर भगवती (मायक्रोमॅक्स), लावा, पॅजेट इलेक्ट्रॉनिक्स, युटीएल नियो लिंक्स, ऑप्टिमस या देशी कंपन्या आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद या संदर्भात माहिती देताना म्हणाले एप्रिल मध्येच केंद्राने इलेक्ट्रोनिक उत्पादन संबंधी प्रोत्साहन योजना -पीएलआय संदर्भातील अधिसूचना जारी केली होती.

या योजनेनुसार कंपन्यांना ४ ते ६ टक्के प्रोत्साहन सवलत मिळणार आहे. १५ हजार वा त्याहून अधिक किमतीच्या स्मार्टफोन साठी हा लाभ विदेशी कंपन्यांना मिळणार आहे. स्थानिक कंपन्यांसाठी मात्र अशी मर्यादा लागू केली गेलेली नाही. त्यामुळे १५ हजारापेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोनवर सुद्धा त्यांना विशेष प्रोत्साहन सवलत मिळणार आहे.