अमेरिकेला हिसका देण्यासाठी चीन लाँच करतेय अंतराळ स्टेशन

फोटो साभार स्पेस डॉट कॉम

अमेरिका आणि चीन या दोन देशात सातत्याने चढाओढ सुरु आहेच पण सायबर आणि इलेक्ट्रोनिक्स क्षेत्रात जणू युद्ध सराव सुरु झाला असल्याचे दिसून येत आहे. अंतराळ क्षेत्रात सुद्धा आत्ता ही स्पर्धा पोहोचली असून अमेरिकेला खुन्नस देण्यासाठी ड्रॅगन स्वतःचे अंतराळ स्टेशन उभारायच्या तयारीत आहे.

सीएमएसअ या चीनच्या अंतराळ संस्थेने गेल्या महिन्यात स्पेस स्टेशन ऑफ चायनाच्या पहिल्या मोड्युलला परवानगी दिली असून हे स्टेशन लवकरच लाँच करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. २०२१ मध्ये हे अंतराळ स्टेशन ३८० किमी अल्टीट्यूड वर स्थापित केले जात असल्याची बातमी चीनच्या ग्लोबल टाईम्सने दिली आहे. यासाठी १८ अंतराळ वीरांची निवड केली गेली आहे.

चीनचा हा निर्णय म्हणजे अंतराळात सुद्धा युध्द भूमी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा अमेरिकेने केला असून त्यांच्या पेंटागॉनने काही महिन्यापूर्वी अंतराळ युद्ध संबंधी धोरणे चीन कडून राबविली जात असल्याचा आरोप केला होता.

चीनच्या वायुसेनेचे मेजर जनरल कायो लियांग यांनी मीडियाशी बोलताना सांगितले अमेरिका चीनला शस्त्रास्त्र स्पर्धेत ओढून सोविएत प्रमाणे आम्हाला नेस्तनाबूद करण्याचा प्रयत्न करत आहे. पण असे वाटणे ही त्यांची चूक आहे कारण जो नेस्तनाबूद होईल तो देश चीन नसेल.

विशेष म्हणजे अमेरिकेच्या वॉशिंग्टन थिंक टँकने २०३० मध्ये चीन अंतराळ योजनात नंबर १ वर असेल असे मत व्यक्त केले होते आणि चीन त्यादिशेने वेगाने प्रवास करत आहे असे दिसून येत आहे.