हाथरसमधील आरोपींची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणार निर्भया प्रकरणातील वकील


नवी दिल्ली – आता हाथरसमधील आरोपींची बाजू न्यायालयात दिल्लीमधील निर्भया बलात्कार प्रकरणात आरोपींसाठी न्यायालयात लढा देणारे वकील एपी सिंह मांडणार आहेत. एपी सिंह यांची नियुक्ती अखिल भारतीय क्षत्रिय महासभेकडून करण्यात आली आहे. अखिल भारतीय क्षत्रिय महासभेकडून सोमवारी यासंबंधी एक प्रस्ताव सादर करण्यात आला होता. याला बैठकीत संमती देण्यात आली असून यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

एपी सिंह यांना आरोपींसाठी न्यायालयात लढा देण्यास माजी केंद्रीय मंत्री राजा मानवेंद्र सिंह यांच्याकडून सांगण्यात आले आहे. यासंबंधी एक पत्र मानवेंद्र सिंह यांनी प्रसिद्ध केले असून अखिल भारतीय क्षत्रिय महासभा त्यांची फी भरेल, असे जाहीर केले आहे. यासोबतच एस-एससी अॅक्टचा दुरुपयोग करुन सवर्ण समाजाची बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केल्यामुळे खासकरुन राजपूत समाजाच्या भावना दुखावल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळेच प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी एपी सिंह यांची नियुक्ती केली जात असल्याचे मानवेंद्र सिंह यांनी सांगितले आहे.