चिनी लष्कर अवघ्या काही मिनिटांमध्ये उद्ध्वस्त करेल अटल बोगदा; चीनचा दावा


बीजिंग – आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरुन भारताबरोबर एकीकडे चीन शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भातील वक्तव्य करत असताना दुसरीकडे भारताला युद्धासंदर्भातील धमक्या देताना चिनी प्रसारमाध्यमे दिसत आहेत. आता हिमाचल प्रदेशमधील मनाली ते लाहौल-स्पिती या भागांना जोडणारा अटल बोगदा भारताला युद्धाच्या वेळी उपयोगी ठरणार नसल्याचे वक्तव्य चिनी सरकारचे वृत्तपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्समधील एका लेखामधून करण्यात आले आहे. शनिवारी या बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर सोमवारीच चीनमधील सर्वात महत्वाच्या वृत्तपत्रांपैकी एक असणाऱ्या ग्लोबल टाइम्समध्ये भारताच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल टिप्पणी करण्यात आली आहे.

दोन्ही देशांमध्ये शांतता असताना भारताला या बोगद्याचा भरपूर फायदा होईल, असे लष्करी क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ असणाऱ्या साँग झाँगपिंग यांनी लिहिलेल्या लेखामध्ये म्हटले आहे. पण त्यांनी त्याचवेळी युद्धाच्या काळामध्ये या बोगद्याचा भारताला फारसा उपयोग होणार नाही, कारण काही मिनिटांमध्ये चिनी सैन्य हा बोगदा उद्ध्वस्त करु शकते, अशी दर्पोक्तीही या लेखात करण्यात आली आहे. युद्धाच्या वेळी खास करुन लष्करी लढाईमध्ये या बोगद्याचा विशेष काही फायदा नसल्याचेही या लेखात म्हटले आहे. बोगदा नष्ट करण्याच्या अनेक पद्धती चीनच्या पीपल्स रिपब्लिक आर्मीकडे असल्याचा दावा लेखात केला आहे. त्यामुळेच भारत आणि चीनने एकमेकांसोबत शांततापूर्ण संबंध काम ठेवणेच दोन्ही देशांच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल, असा सल्लाही या लेखातून देण्यात आला आहे.

सध्या शांततापूर्ण संबंध दोन्ही देशांमध्ये असल्याने युद्धाच्या वेळी अटल बोगदा उपयोगात येणार नाही याचा भारताला अंदाज येत नसल्याचेही या लेखात म्हटले आहे. हा बोगदा तयार झाल्याने संपूर्ण भारतात आनंद व्यक्त केला जात असला तरी राजकीय नेत्यांकडून या बोगद्याचा वापर केवळ दिखाव्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी केला जात आहे. हा बोगदा म्हणजे राजकीय प्रचाराचे माध्यम झाला आहे, असा टोलाही या लेखामधून लगावण्यात आला आहे. हा बोगदा भारताला युद्धाच्या काळात फारसा उपयोगी ठरणार नाही. पण हा विचार भारतीय राजकरण्यांच्या डोक्यात नसेलच कारण ते हा बोगदा राजकीय प्रचारासाठी वापरत असल्याचे या लेखात म्हटले आहे. या भागामध्ये हा बोगदा केवळ लष्करी वापराच्या दृष्टीने बांधण्यात आल्याचा दावाही या लेखामध्ये करण्यात आला आहे.

भारताची युद्ध क्षमता कोणताही बोगदा उभारला तरी वाढणार नसल्याचे या लेखात म्हटले आहे. भारत आणि चीनच्या युद्ध क्षमतेमध्ये नक्कीच फरक आहे. चीनच्या तुलनेत भारताची युद्ध क्षमचा खूपच कमकुवत आहे. युद्ध क्षमतेमध्ये भारत हा चीनपासून खूपच दूर आहे. याच वक्तव्याचा आधार घेत भारताने युद्धासंदर्भात संयम बाळगावा आणि चीनला उकसवण्याचा प्रयत्न करु नये, असा सल्ला लेखामधून देण्यात आला आहे.