बहुचर्चित स्त्री भ्रूण हत्या प्रकरणातील सुदाम मुंडेचा जामीन न्यायालयाने फेटाळला


बीड : अंबाजोगाई न्यायालयाने देशभर गाजलेल्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामधील स्त्री भ्रूण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. सुदाम मुंडेचा जामीन अर्ज फेटाळून लावला. सुदाम मुंडेला अनधिकृतपणे रुग्णालय सुरु केल्यावरुन पुन्हा अटक करण्यात आली होती. अद्याप या प्रकरणाचा तपास सुरु असून तत्पूर्वी जामीन मिळावा यासाठी डॉ. सुदाम मुंडे याने विनंती अर्ज केला होता. दरम्यान हा जामीन अर्ज अंबाजोगाई न्यायालयाने फेटाळला आहे.

शिक्षा भोगून आल्यानंतर गेल्याच महिन्यात डॉ. सुदाम मुंडे याने पुन्हा बेकायदेशीरपणे वैद्यकीय प्रॅक्टिस सुरु केल्याचे समोर आले होते. 6 सप्टेंबरला पहाटे बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाने परळीतील मुंडे हॉस्पिटलवर पोलिसांनी छापा टाकला. यात हॉस्पिटलमधील साहित्य जप्त करण्यात आले. तसेच, पोलिसांनी सुदाम मुंडेला पुन्हा अटक केली. तो डॉक्टर असलेल्या मुलीच्या नावाने स्वतः प्रॅक्टिस करत होता.

न्यायालयाने डॉ. सुदाम मुंडेची वैद्यकीय पदवी कायमस्वरुपी रद्द केली आहे. पण तरीही न्यायालयाचे सर्व आदेश धुडकावून त्याच्याकडून पुन्हा प्रॅक्टिस सुरु होती. सुदाम मुंडे गेल्या 6 महिन्यांपासून बिनधिक्कतपणे प्रॅक्टिस करत होता. मुंडे याच्या डॉक्टर मुलीच्या नावाने या हॉस्पिटलचा परवाना आहे. असे असतानाही सुदाम मुंडे आपल्यावरील बंदीला झुगारुन प्रॅक्टिस करत होता.