धक्कादायक माहिती; सुशांतची बहिण बनावट डिस्क्रिप्शन, रेकॉर्डच्या आधारे करत होती ड्रग्ज देण्याचा प्रयत्न


मुंबई – सीबीआयकडून बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा सुरु असलेला तपास अद्याप सुरु आहे. तर सुशांतच्या हत्येचा दावा दुसरीकडे एम्स रुग्णालयाने फेटाळला असून ही आत्महत्याच असल्याचे म्हटले आहे. याच दरम्यान सुशात प्रकरणाचा ड्रग्जच्या दिशेने तपास सुरु असून अनेक सेलिब्रेटींची एनसीबीकडून चौकशी सुरु आहे. यादरम्यान सुशांतची एक बहिण त्याला बनावट डिस्क्रिप्शन, रेकॉर्डच्या आधारे ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

दिल्लीतील डॉक्टर तसेच सरकारी रुग्णालयाच्या मदतीने सुशांतची एक बहिण बनावट डिस्क्रिप्शन, रेकॉर्ड तयार करत त्याला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत होती. सुशांतची बहिण, नातेवाईक आणि काही डॉक्टरांविरोधात त्यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तो एफआयआरही सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. यासंबंधीही सीबीआय तपास करेल असा विश्वास असल्याचे परमबीर सिंग यांनी म्हटले आहे.

तुला मानसिक समस्या असल्याचे सुशांतच्या डॉक्टरने त्याला सांगितले होते. बायपोलार डिसॉर्डर त्याला होता. त्याने मार्चपासून औषध घेणे बंद केल्यामुळे त्याचा तणाव वाढला असल्याचेही परमबीर सिंग यांनी सांगितले. सुशांत सिंह ड्रग्ज घेत असल्याची माहिती आमच्याकडेही आली होती. ड्रग्ज घेत असल्याने मृत्यू झाला का याचा तपास आम्ही करत होतो, अशी माहिती देखील परमबीर सिंग यांनी दिली.

एकूण ५६ जणांचा जबाब सुशांत प्रकरणी नोंदवण्यात आला होता. ५६ पैकी फक्त पाच जण चित्रपसृष्टीशी संबंधित असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. गुप्तेश्वर पांडे आयपीएस अधिकारी असून माझे वरिष्ठ आहेत. त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही ठरणार नाही आणि ते माझ्या मनाला पटणार नसल्याचे सांगत परमबीर सिंग यांनी त्यांच्या आरोपांवर उत्तर देणे टाळले.

समाज माध्यमांतील काही जण अजेंडा चालवत मुंबई पोलिसांची बदनामी करत खोटी माहिती पसरवत होते. आमच्या तपासाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा आमच्याकडे सर्वोच्च न्यायालयाने तपासातील प्रगती दाखवणारा रिपोर्ट मागितला, तेव्हा तो एका बंद लिफाफ्यात आम्ही सादर केला होता. तो एक गोपनीय अहवाल होता. राज्यातील पाच लोकांपेक्षा अधिक कोणीही तो रिपोर्ट पाहिला नव्हता, अशी माहिती परमबीर सिंग यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, हा रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी पाहिला, त्यावेळी मुंबई पोलिसांच्या तपासात कोणतीही चूक दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर आमच्या तपासावर त्यांनी समाधान व्यक्त केले. मुंबई पोलीस आपल्या एडीआरचा तपास करत राहील सांगताना सर्वोच्च न्यायालयाने बिहारचा एफआयआर सीबीआयकडे सोपवला. जर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला, तो सीबीआयकडे दाखल होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याची माहिती परमबीर सिंग यांनी दिली.

कोणालाही आमच्या तपासाची किंवा रिपोर्टची माहिती नव्हती. तो रिपोर्ट कोणीही पाहिलेला नव्हता. चॅनेलवर जाऊन आमच्या तपासावर अनेक मोठमोठ्या वकिलांनीही टीका केली. आपण कोणत्या आधारे आरोप केला याबद्दल त्यांना मी विचारणा केली. त्यांनी त्यावेळी आम्हाला चॅनेलच्या अँकरकडून माहिती मिळाली असे सांगितल्याची माहिती त्यांनी दिली. कोणत्याही व्यक्तीला ज्याला आमच्या तपासात आतापर्यंत काय झाले आहे, रिपोर्टमध्ये काय होते, हे चॅनेलने दाखवावे असे जाहीर आव्हान परमबीर सिंग यांनी यावेळी दिले आहे.