राफेल प्रमाणेच ‘शेती वाचवा’ अभियानामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार राहुल गांधी


मुंबई – राज्यसभेत प्रचंड गदारोळात शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभीकरण) विधेयक, 2020 आणि शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) करार किंमत आश्वासन आणि कृषीसेवा विधेयक, 2020 ही दोन शेती विधेयके मंजूर करण्यात आली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात विरोधकांसह शेतकरी संघटनांकडून आवाज उठवला जात आहे. त्यानंतर काँग्रेसच्या वतीने आता पंजाबच्या मोगा जिल्ह्यातून ‘शेती वाचवा’ अभियान सुरू झाले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी या तीन दिवसीय अभियानाचे नेतृत्व करत आहेत.

मोहिमेदरम्यान राहुल गांधी स्वत: ट्रॅक्टर चालवत खेड्यांमधील शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. हजारो शेतकरी या ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होणार असल्याचे म्हटले होते. काँग्रेसच्या या रॅलीत मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. पण शेतकऱ्यांच्या उपस्थितीबद्दल अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात आली. यावरूनच भाजपचे नेते निलेश राणे यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून निलेश राणे यांनी याबाबतचे एक ट्विट केले आहे. राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार. कृषी बिलाची चर्चा सभागृहात होत असताना राहुल गांधी प्रदेशात होते, शेतकऱ्यांना त्यांचे हित बरोबर कळते. राहुल गांधींच्या ‘शेती वाचवा’ आंदोलनात, सभांमधून शेतकरी मात्र गायब!, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.