नवी दिल्ली – हाथरस येथे दलित मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर देशासह उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघालेले असतानाच रविवारी अलिघर तुरुंगाला हाथरसचे भाजप खासदार राजवीर सिंह दिलेर यांनी भेट दिली. हाथरसमधील दलित मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य चार आरोपींना याच तुरुंगामध्ये ठेवण्यात आले आहे. पण राजवीर यांनी यासंदर्भात नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण कोणत्याही कैद्याची भेट घेण्यासाठी गेलो नव्हतो असे सांगतानाच तुरुंग प्रशासनाच्या जेलरने आपल्याला चहापाण्यासाठी बोलावल्याचे स्पष्टीकरण दिले. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार राजवीर यांनी हाथरस प्रकरणातील आरोपींना ठेवण्यात आलेल्या तुरुंगाला भेट दिल्याने काँग्रेसने त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
हाथरस बलात्कार प्रकरणातील आरोपीला भेटण्यासाठी तुरुंगात पोहचले भाजप खासदार
अशी भयंकर घटना ज्या प्रदेशामध्ये घडली आहे तेथील खासदाराने अशाप्रकारे आरोपी असणाऱ्या तुरुंगाला भेट देणे हे सर्वात आक्षेपार्ह काम असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तुरुंगला भाजप खासदार राजवीर यांनी दिलेली भेट संपवल्यानंतर यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी आपण अलिघरच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना (एसएसपी) भेटण्यासाठी गेल्याचे सांगितले. पण ज्या पोलीस अधिकाऱ्याची भेट घेण्यासाठी आपण गेलेलो त्याला कोरोनाची लागण झाल्याने त्यांची भेट घेता आली नाही. मी माझ्या समर्थकांच्या कामासंदर्भात एसएसपींच्या घरी गेलो होतो, तिथून येताना तुरुंगाबाहेर मला वाटेत काही समर्थक आपल्याला भेटले. त्यांच्याशी चर्चा करत असतानाच तुरुंग प्रशासनासाठी काम करणाऱ्या जेलरने मला चहापाण्यासाठी बोलावले, असा दावा राजवीर यांनी केला आहे.