पोलिसांवर कारवाई झाली, मग त्या तरुणाला मारहाण करणाऱ्या आव्हाडांवर कधी? – सोमय्या


मुंबई – राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाला ठाण्यात मारहाण झाली होती. वर्तकनगर पोलिसांकडून याप्रकऱणी तीन पोलिसांच्या अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई घटनेच्या सहा महिन्यांनी करण्यात आली. दरम्यान जितेंद्र आव्हाडांना याप्रकरणी कधी अटक होणार? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.

टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना किरीट सोमय्या यांनी विचारणा केली आहे की, ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:च्या १५ पोलीस अंगरक्षकांच्या माध्यमातून इंजिनिअर अनंत करमुसेचे अपहरण केले, त्यानंतर त्याला घरी आणले आणि मारहाण केली. ठाकरे सरकारने याप्रकरणी सहा महिन्यांनी तीन पोलिसांना अटक केली आहे. आतापर्यंत नऊ लोकांना अटक झाली. पण जितेंद्र आव्हाड यांना कधी अटक होणार?.


एप्रिल महिन्यात किरीट सोमय्या यांना मारहाण झालेल्या तरुणाची भेट घेण्यासाठी जात असताना अटक करण्यात आली होती. मुलुंड येथील त्यांचे निवासस्थान निलम नगर येथून किरीट सोमय्यांना अटक करण्यात आली होती. आपण जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आलेल्या तरुणाला भेटण्यासाठी जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.