करोना बळीसाठी अमेरिकेत अनोखी श्रद्धांजली सभा

फोटो साभार नवभारत टाईम्स

अमेरिकेत करोनाने घेतलेल्या बळींना श्रद्धांजली देण्यासाठी एका सभेचे आयोजन केले गेले होते त्याचे फोटो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेकांना या फोटोनी भावूक बनविले आहे. अमेरिकेत करोना बळींची संख्या दोन लाख नउ हजारावर पोहोचली असून ७० लाख नागरिक संक्रमित आहेत. करोना प्रभावित देशात अमेरिका अनेक महिने एक नंबरवर आहे.

करोना बळी श्रद्धांजली निमित्त ‘नॅशनल कोविड १९ डे ऑफ रिमेंबरन्स’ चे आयोजन केले गेले त्यावेळी २० हजार खुर्च्या मांडल्या गेल्या होत्या आणि त्या सर्व रिकाम्या होत्या. हे दृश्य अनेकांचे डोळे ओले करून गेले. अमेरिकन नागरिकांच्या नजरा आता व्हाईट हाउस कडे लागल्या आहेत. अनेकांनी आपले प्रियजन या साथीमध्ये गमावले आहेत. ग्रॅमी पुरस्कार विजेता गायक डीयोन वारविक या सभेच्या आयोजकांपैकी एक आहे. तो म्हणतो, गेले सहा महिने करोना साथीमुळे दोन लाखावर जीवनाचा हृदयद्रावक अंत झालेला आम्ही पाहतो आहोत.

या संक्रमणातून बचावलेल्या लोकांनी एकत्र येऊन करोना विरोधात लढण्याची आवश्यकता भासते आहे. आकडेवारी सांगते अमेरिकेची लोकसंख्या जगाच्या लोकसंखेच्या ४ टक्के आहे मात्र जगभरात जे करोना मृत्यू झाले आहेत त्यात अमेरिकेतील मृत्यूंचे प्रमाण २० टक्के आहे. अमेरिकेत अजूनही करोना संक्रमणाचा वेग मंदावलेला नाही.