पंतप्रधान मोदींवर करोनाची टांगती तलवार?

रोहतांग पास येथे बांधल्या गेलेल्या देशासाठी अति महत्वाच्या अटल बोगद्याचे उद्घाटन ३ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते केले गेले मात्र यावेळी हिमाचल सरकार कडून झालेल्या एका चुकीमुळे पंतप्रधान मोदी यांना अडचणीला सामोरे जाण्याची पाळी येऊ शकते असे स्पष्ट झाले आहे. या कार्यक्रमामुळे मोदींना करोना संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, वनमंत्री राकेश पठानिया पंतप्रधान मोदी यांच्या संपर्कात आले होते. हे दोघेही त्यापूर्वीच करोना चाचणी पोझिटिव्ह आलेल्या कुल्लू येथील आमदार सुरेंद्र शौरी यांच्या संपर्कात आले होते. अटल बोगदा उद्घाटनाच्या एक दिवस अगोदर शौरी यांची करोना चाचणी पोझिटिव्ह आली होती. मोदी यांच्या शिवाय संरक्षण मंत्री राजनाथसिंग, अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर हेही यावेळी सभा मंचावर जयराम ठाकूर आणि राकेश पठानिया यांच्या समवेत उपस्थित होते. शौरी यांची चाचणी पोझिटिव्ह आल्याचे समजल्यावर येथे हडकंप माजला आहे.

हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर या संदर्भात म्हणाले, शौरी याना आम्ही अगोदर भेटलो होतो पण त्यांनतर त्यांची करोना चाचणी पोझिटिव्ह आल्यावर मी आणि वनमंत्री आयसोलेशन मध्ये गेलो आहोत पण ही माहिती अजून पंतप्रधान कार्यालयाला दिली गेलेली नाही. आम्ही पंतप्रधान मोदी यांच्या समवेत एका मंचावर होतो पण आम्ही सर्वानी मास्क लावले होते. आमच्या सोबत असलेले हिमाचल मधील अन्य नेते आणि सल्लागार क्वारंटाईन झाले आहेत.