दुबई येथे बनलेय जगातील सर्वात मोठे कारंजे

फोटो साभार झी न्यूज

करोनाच्या भीतीमुळे गेले सहा महिने घरात अडकून पडलेले नागरिक आता प्रवास करण्याची स्वप्ने पाहू लागले आहेत. पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे ठिकाण दुबई पर्यटकांसाठी अधिक आकर्षक बनले असून तेथे जगातील सर्वात मोठे कारंजे उभारले गेले आहे. विशेषः म्हणजे यापूर्वी सुद्धा जगातील सर्वात मोठे कारंजे दुबई येथेच होते पण त्यापेक्षाही मोठे कारंजे येथे तयार झाले आहे. यामुळे जगातील मोठ्या कारंज्यातील पहिल्या दोन नंबरची कारंजी असणारा दुबई एकमेव देश बनला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पाम फौंटन हे नवे प्रचंड मोठे कारंजे पाम जुमेरा हॉटेलच्या वॉटर फ्रंटचे मुख्य आकर्षण बनणार आहे. समुद्रात १४ हजार चौरस फुट परिसरात हे कारंजे पसरले असून त्याचा सुपर शूट १५० मीटर उंच उसळेल. या कारंजात ३ हजाराहून अधिक एलईडी बल्ब लावले गेले आहेत.

पाम फौंटन येथे पाच विविध शो सादर होणार असून सुर्यास्तापासून मध्यरात्री पर्यंत दर अर्ध्या तासाने तीन मिनिटांचा एक शो सादर होणार आहे. चीन या प्रकल्पाचा एक भाग असून बीजिंग वॉटर डिझाईन टेक्नोलॉजीचे अध्यक्ष शीन सू म्हणाले या कारंजाचे डिझाईन, निर्मिती आणि संचलन यात आम्ही सहभागी आहोत. गिनीज बुक मध्ये या करंजाची नोंद केली जाणार असून त्यासाठी आवश्यक माहितीची खात्री करून घेण्याचे काम सुरु झाले आहे. त्यानंतर लवकरच वर्ल्ड क्लास लँडमार्क विभागात त्याची नोंदणी होणार आहे.