जुना स्मार्टफोन खरेदी करताना तो चोरीचा नाही याची अशी करा खात्री

अनेक जणांना स्मार्टफोन हवा असतो पण बरेच वेळा त्याच्या किमती बजेटबाहेर असल्या तर सेकंड हँड फोन घेण्याकडे लोकांचा मोठ्या प्रमाणावर कल दिसून येतो. तुम्हाला हव्या त्या मॉडेलचे आणि चांगल्या कंडीशन मधील असे सेकंडहँड फोन निम्म्या किमतीत मिळू शकतात. पण असा जुना फोन खरेदी करताना पुरेशी सावधगिरी बाळगली गेली नाही तर अडचणीत सापडण्याची वेळ येऊ शकते. विशेषत फोन चोरीचा असेल तर. अनेकदा विक्रेते खोटी माहिती देऊन असे फोन विकत असतात. तेव्हा काय खबरदारी घ्यावी याच्या काही टिप्स अश्या-

मोबाईल चोरी हा जसा गुन्हा आहे तसा चोरीचा फोन खरेदी करणे हा सुद्धा गुन्हा आहे. त्यामुळे तुम्ही खरेदी करणार असाल तो फोन चोरीचा नाही याची खात्री करून घ्यायला हवी. फोन चोरीचा नाही किंवा त्यांच्या आयएमईआय नंबर मध्ये काही गडबड केली गेलेली नाही हे तपासण्यासाठी एक ट्रिक वापरता येते.

तुम्ही खरेदी करणार असलेल्या फोनचा आयएमईआय नंबर प्रथम माहिती करून घेतला पाहिजे. त्यासाठी *#06# असे डायल करावे. त्यानंतर स्क्रीनवर नंबर दिसेल, ड्युअल सीम असेल तर दोन नंबर दिसतील. त्यातील कुठलाही एक नंबर लिहून घ्या आणि आता टेक्स्ट मेसेज पाठविण्यासाठी मेसेज आयकॉन क्लिक करून KYM टाईप करा आणि हा मेसेज 14422 या नंबरवर पाठवून द्या. त्यानंतर तुम्हाला एक उलट मेसेज येईल त्यात फोनचे डीटेल्स असतील. आयएमईआय नंबर असेल तसेच उत्पादकाचे नाव, ब्रांड नव, फोन मॉडेल नंबर असेल. हे सर्व डीटेल्स मॅच होत असतील तर आयएमईआय नंबर बरोबर आहे असे समजावे आणि असा फोन खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा.

या ऐवजी मेसेज मध्ये invalid/black-listed/already in use/duplicate असे दिसत असेल तर फोन खरेदी करण्याचा धोका स्वीकारू नये.